गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सिंगापूर , सोमवार, 2 नोव्हेंबर 2015 (13:05 IST)

सानिया-मार्टिना जोडीस विजेतेपद

भारताची सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगिसने डब्लूटीए फायनल्स सिंगापूर टेनिस स्पर्धेतील दुहेरीचे जेतेपद पटकावले. या जोडीचे वर्षभरातील नववे विजेतेपद आहे. 
 
अंतिम फेरीत रविवारी सानिया-हिंगिसने आठव्या सीडेड स्पेनच्या गॅबिन मुगुरुझा आणि कार्ला सुआरेझ नॅवरोवर तासाभराच्या लढतीत ६-०, ६-३ असा विजय मिळवला. सानियाचे हे सलग दुसरे डब्लूटीए दुहेरीचे जेतेपद आहे. गेल्या वर्षी तिने कारा ब्लॅकसह बाजी मारली होती. 
 
सानिया आणि मार्टिनाने सलग २२ सामने जिंकण्याचा पराक्रमही गाजवला असून, या स्पर्धेत एकही सेट गमावलेला नाही. महान टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हाने सानिया आणि मार्टिनाला डब्ल्यूटीए फायनल्स विजेतेपदाची टड्ढॉफी प्रदान केली. 
 
डब्ल्यूटीए टूर फायनल्स ही महिला टेनिसची इयरएण्ड चॅम्पियनशिप आहे. वर्षभरात चांगली कामगिरी बजावणा-या टॉप टेनिसस्टार्स या स्पर्धेत सहभागी होतात. सानियाने याआधी गेल्या वर्षी झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकच्या साथीने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर सलग दुस-या वर्षी सानियाने डब्ल्यूटीए फायनल्समध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद मिळवले आहे आणि मोसमाचा शेवटही अगदी दिमाखात केला आहे. २०१५ वर्ष सानिया-हिंगिससाठी खूपच फलदायी ठरले आहे. १० पैकी ९ स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरी गाठली. विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या दोन ग्रँडस्लॅमसह सात ओपन स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत. 
 
डब्ल्यूटीए फायनल्सचे विजेतेपद हे सानियाचे मोसमातील दहावे आणि मार्टिनासोबतचे नववे विजेतेपद ठरले आहे. सानियाने यंदा जानेवारी महिन्यात बेथानी मॅटेक सँड्ससह सिडनी इंटरनॅशनल ओपनमध्ये विजय साजरा केला होता. पण मार्चमध्ये मार्टिना हिंगिससह जोडी जमल्यापासून तिने विजेपदांचा सपाटाच लावला. सानिया आणि मार्टिना या जोडीने यंदा विम्बल्डनमध्ये शानदार विजय मिळवला. सानियाचे ते महिला दुहेरीतील पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले. मग अमेरिकन ओपनमध्येही सानिया आणि मार्टिनाने बाजी मारली आणि आपले सलग दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद साजरे केले. मग मोसमाच्या अखेरीस सानिया आणि मार्टिनानं डब्ल्यूटीए टूर फायनल्स ही मानाची स्पर्धाही जिंकली. त्याशिवाय यंदा इंडियन वेल्स, मियामी, चाल्र्सटन, ग्वांग्झू, वुहान आणि बीजिंगमधल्या स्पर्धेतही ही जोडी अजिंक्य ठरली.