बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. शीख
  4. »
  5. दहा गुरु
Written By वेबदुनिया|

गुरू अंगदसाहेब

गुरू अंगदसाहेब यांचा जन्म पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात मार्च १५०४ मध्ये झाला. गुरू अंगदसाहेब यांचे वडिल लहान मोठा व्यवसाय करायचे. आईचा कल अध्यात्माकडे असल्याने गुरू अंगदसाहेबही दुर्गा मातेची आराधना करायला लागले. नंतर त्यांचा विवाह माता खिवीजी यांच्याशी झाला.

त्यांना दोन पुत्र व दोन मुली होत्या. बाबराच्या आक्रमणामुळे त्यांच्या संपूर्ण कुटूंबाला स्थलांतरीत व्हावे लागले. यानंतर त्यांचा परिवार अमृतसरपासून काही अंतरावर असलेल्या गावात रहायला आला

गुरू अंगदसाहेबांनी एकदा गुरू नानक साहेबांचा उपदेश ऐकला. त्यानंतर गुरू नानक साहेबांची भेट घेण्याचा त्यांनी ध्यास घेतला. त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन झाले. त्यांनी गुरूची भक्ती व सेवेत स्वत:ला झोकून दिले.

त्यांच्या भक्ती व साधनेने प्रभावित होऊन गुरू नानक साहेबांनी १५३९ मध्ये गुरू नानक साहेबांनी गादी त्यांच्याकडे सोपवून त्यांना दूसरे गुरू म्हणून घोषित केले. यानंतर गुरू नानक साहेब यांनी आपल्या शिष्याची अनेक प्रसंगामध्ये परीक्षा पाहिली.

गुरू अंगद साहेब या सर्व परिक्षेत उत्तीर्ण झाले. गुरू अंगद साहेब यांनी आपले गुरू नानक साहेब यांची सात वर्षांपर्यंत सेवा केली. त्यांच्या मृत्यूनंतर गुरू नानक देव यांचे विचार व तत्वज्ञानाचा त्यांनी प्रसार केला. गुरू अंगद साहेबांनी शैक्षणिक क्षेत्रातही महत्वाचे योगदान दिले.

त्यांनी पंजाबी लेखन शैलीत सुधारणा करून नवीन गुरूमुखी लिपी वापरात आणली. त्यांनी शाळा उघडून शिक्षणाचा प्रसार केला. तरूण पिढी सशक्त व उमदी घडविण्यासाठी त्यांनी मल्ल आखाडे उघडले. शारीरीक व अध्यात्मिक शिक्षण देण्याची ती केंद्रे बनली.

त्यांनी गुरू नानक साहेबांचे चरित्रही लिहिले. याशिवाय त्यानी लिहिलेल्या पदांचा गुरू ग्रंथसाहिबमध्ये समावेश करण्यात आला आहे. गुरू अंगद साहेबांनी शीख धर्माच्या प्रसार प्रचारासाठी पीठांची स्थापना केली.

शीख धर्माचे तत्वज्ञान रूजवून त्यांनी धर्मास खर्‍या अर्थाने प्रस्थापित केले. त्यांच्यानंतर प्रथेप्रमाणे त्यांनी गुरू अमरदेव साहेबांना उत्तराधिकारी नेमले. मार्च १५५२ मध्ये गुरू साहेबांची प्राणज्योत मालवली.