शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (11:20 IST)

भाजपची पहिली यादी आठवड्याभरात- देवेंद्र फडणवीस

महायुतीमध्ये सगळं काही नियोजनाप्रमाणे झाले तर  आठवड्याभरात पहिली यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती  भाजपेच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.  फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
फडणवीस म्हणाले, पक्षाच्या काही उमेदवारांची नावे पक्षाच्या  केंद्रीय संसदीय समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. त्याला  मंजुरी मिळाल्यानंतर ती जाहीर केली जाणार असल्याचेही फडणवीस  यांनी सांगितले. भाजपच्या प्रदेश समितीची आज मुंबईत बैठक  झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी बैठकीत  झालेल्या चर्चेबाबत पत्रकारांना माहिती दिली. 
 
फडणवीस म्हणाले, विधानसभा निवडणुकीत प्रचार कसा केला  पाहिजे, त्यासाठी कोणकोणती माध्यमे वापरावीत याबाबत बैठकीत  चर्चा झाली. येत्या 4 सप्टेंबरला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित  शहा मुंबईत येणार आहे. परंतु ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांची भेट घेतील की नाही याबाबत अद्याप काही ठरलेले नाही.  अमित शहा मुंबईतील काही गणेश मंडळांना भेट देणार असून काही  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भाजप आणि  शिवसेनेमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव नसल्याचेही फडणवीस  यांनी सांगितले. 
 
जागावाटपाबाबत मि‍त्रपक्ष शिवसेनेने बोलणी सुरु आहे. लवकरच  जागा वाटपाचे सूत्र निश्चित केले जाणार असल्याचेही फडणवीस  यांनी सांगितले. बैठकीला पक्षाचे नवे महाराष्ट्र प्रभारी ओमप्रकाश  माथूर, राजीव प्रताप रुडी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते  एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे  यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.