गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: सोमवार, 8 सप्टेंबर 2014 (12:30 IST)

महायुती सावरली, आघाडीत मात्र बिघाडी

आचारसंहिता लागू होणे आणि त्या माध्मातून विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणे यासाठी आता फक्त काही तासांचा अवधी उरलेला आहे. पुढच्या काही काळातच आचारसंहितेची व निवडणूक कार्यक्रमाची घोषणा दिल्लीतील निर्वाचन भवनात मुख्य निवडणूक आयुक्त संपत हे करणार आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधी उरकण्याची सारी कामे करण्याची घाई राजकीय पक्षांचे नेते करीत आहेत. अनेक आमदारांनी आपापल्या विभागातील महत्त्वाच्या दैनिकांमध्ये पान पान जाहिराती छापण्याचा सपाटा लावलेला आहे. राज्य सरकारच्या जाहिरात मोहिमेवर उच्च न्यायालयात प्रश्नचिन्ह लावले जात असतानाही ती मोहीम काही थांबलेली नाहीच. 
 
राज्यातील महत्त्वाच्या राजकीय पक्षांनीही निवडणुकीच्या रणनीतीला अंतिम स्वरूप देण्याची सुरुवात केलेली आहे. पण त्यात राजकीय वातावरण गढूळ झालेले होते. तुटतेय की राहतेय असे वाटत होते. विविध पक्ष आघाडी, युती होणार की नाही, टिकणार की नाही, याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यात कार्यकत्र्यांचा सारा काळ चाललेला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, एकमेकांना, ‘नाही मी बोलत नाथा’चेच राग आळवून दाखवत आहेत. सेना- भाजपमध्येही संशयाचेच वातावरण होते. मात्र ते ढग सध्या हटलेले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मुंबई भेट ही त्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची थेट भेट मातोश्रीवर जाऊन घेतली. यातून त्यांनी अनेकांचे ताबूत थंडे करून टाकले. शहा यांची भूमिका, सेना-भाजप युतीच्या विरोधात आहे, त्यांना शत-प्रतिशत भाजपची सत्ता महाराष्ट्रात हवी आहे, अशी वदंता राजकीय वतरुळात जोरात होती. शहा यांची कामाची पद्धती माहिती असणारे जाणकार तसे सांगत होते.
 
शहा यांच्याबाबत सेनेतही तशीच साशंकताच होती. त्यामुळेच तर फेसबुक व अन्य माध्मांतून भाजप नेत्यांना ‘शहा’णे व्हा! असे संदेश देण्यात येत होते. त्या पोस्टरबाजीमुळे खरोखरीच सेना-भाजपची तीस वर्षाची युती तुटणार की काय, असे वाटू लागले होते. शहा यांनी मातोश्रीवर जावे की न जावे यावरूनही भाजपतच मतभेद होते. शिवाय शहा यांचा जो कार्यक्रम दिल्लीहून जारी झाला त्यात, अमितभाई हे सर्व प्रथम मातोश्रीवरच जाणार, असे दिले होते. पण हे मातोश्री निवासस्थान ठाकरेंचे नव्हे, तर तावडेंचे होते! विनोद तावडेंच्या घराचे नाव आहे मातोश्री हाईटस! पण तावडेंच्या लाईटमध्ये ठाकरेंची मातोश्री निराळी हे लक्षात आले तसे मीडियातूनही तीच चर्चा जोरात सुरु झाली की, अमित शहा सेनेला टाळत आहेत!
 
‘एकदा शिवसेनेला धडा शिकवाच, युती तोडाच’ असेही म्हणणारे अनेक नेते भाजपत होते व आहेतही. सेनेमुळे आपले नुकसान होते आहे, मोदींच्या लाटेचा फायदा घेत, युती तोडा असाही सल्ला काही नेते भाजपत देत होते. पण भाजपच्या सर्वच प्रमुख नेत्यांना तसेच सेनेमधीलही प्रमुख नेत्यांना, युती टिकायला हवी व युतीची आवश्यकता आहेच, हे मान्यच होते. त्यामुळेच दोघेही एकेक पाऊल मागे सरले आणि शहा-ठाकरे भेट घडून आली. त्या आधी अमितभाईंनी शिवाजी पार्कवर मुद्दाम जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून सैनिकांची मने जिंकून घेतली. 
 
युतीमधील तणावाच्या चर्चा आणखी रंगत होत्या कारण महायुतीतही अस्वस्थपणा होता. त्याच वेळी शिवसेना-भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील बोलणीही फारशी आशादायक वातावरणात सुरु नव्हती. अनेक अडचणी असल्याचे नेते सांगत होते. त्यातच महायुतीमध्ये सहभागी असणार्‍या रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष आठवले, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, विनायक मेटेंचा मराठा महासंघ या सार्‍या घटकांचीही तडफड सुरु झालेली होती. प्रत्येक पक्षाला अधिक जागा हव्याच आहेत असे नेते सांगत होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे तर म्हणाले की, तुम्ही ज्या जागांची मागणी करताय त्या दिल्यातर मग शिवसेना भाजपला प्रत्येकी पन्नास पन्नास तरी जागा उरणार आहेत का? कधी रामदास आठवले तर कधी महादेव जानकर, मध्येच केव्हा तरी राजू शेट्टी हे तक्रारी करत होते. महायुतीचे काही खरे नाही, आम्हाला मनाप्रमाणे जागा देतच नाहीत, सेनावाले बोलायलाच मागत नाहीत, भाजपवाले जागाच सोडत नाहीत असे सारखे सांगतच होते.
 
त्यामुळे या स्थितीत महायुतीचे काही खरे नाही, असेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही वाटू लागलेले होते आणि जर महायुती विखुरणारच असेल तर मग आपणही सर्व जागा लढवण्याचे धाडस करावे, असे या आघाडीच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना वाटू लागले होते. आता अमित शहांच्या मुंबई भेटीनंतर सेना-भाजपतील संघर्ष, तणाव कमी झालेला आहे, पण तरी काँग्रेसवाल्यांची खुमखुमी काही कमी झालेली दिसत नाही. महाभारतात कौरव-पांडव तसे भाऊ भाऊच, पण सुईच्या अग्रावर मावेल एव्हढीही भूमी देणार नाही, अशी भूमिका दुर्योधनाने घेतली आणि तिथे महाभारताचे युद्ध पेटले. तसे काहीसे आपल्याकडे युती आघाडीत झाले आहे. सेना-भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी सर्वच प्रमुख पक्षांना असे वाटते आहे की सर्व 288 जागा लढवून तर पाहाव्यात एकदा. त्यातच महाराष्ट्र नव निर्माण सेनेचेही घोडे रेसमध्ये धावणार आहे. पण ते किती जागा लढवणार याचे स्पष्ट चित्र कुणाकडेच नाही. अगदी राज ठाकरेंनाही ते कोडेच असेल. त्यांनी यावेळी उमेदवार निवडीचे तंत्र बदलले आहे. त्यांचे काही नेते सांगतात की आम्ही किमान दोनशे जागा लढवू. अन्य काहींच्या म्हणण्यानुसार मनसेकडे शंभरही मतदारसंघात गंभीर व ताकदीने लढू शकणारे उमेदवार मिळालेले नाहीत. सेना-भाजपचे फाटणार अशा वातावरणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सरत्या सप्ताहात सांगितले होते की जर युतीचे नाही जमले तर आम्ही सर्व जागा लढण्याचाही विचार करू शकतो. म्हणजेच काँग्रेस आघाडीचे भवितव्य युतीवर अवलंबून होते व आहे असाच त्याचा अर्थ होता.
 
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिक्षक दिनाच्या संदेशामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अडचणी वाढलेल्या आहेत. एव्हढय़ा मोठय़ा प्रमाणात पंतप्रधानांनी थेट छोटय़ा मुला-मुलींशी व शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यातून त्यांच्या स्वत:विषयीची व पर्यायाने त्यांच्या पक्ष व केंद्र सरकार विषयीची सकारात्मक भावना मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे.
 
मोदींच्या या संदेशाविरोधात राज्यात वातावरण तापवण्याचा प्रयत्न स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीच केला होता. काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरून माणिकराव ठाकरे आणि अशोक चव्हाणांच्या साक्षीने चव्हाण म्हणाले होते की पंतप्रधानांच्या भाषणासंबंधी जे परिपत्रक निघाले त्याची भाषा चुकीची होती, सक्ती क.रणे चूक आहे वगैरे. सत्तारूढांच्या प्रेरणेने काही शिक्षक संघटनांनी संदेशाला उघड विरोधही केला होता आणि भाषण शाळांमधून दाखवले जाऊ नये असे प्रयत्नही झाले. पण ते सारे फोल ठरले. 
 
मुंबई, ठाणे परिसरातील सहा हजार शाळांमध्ये मोदींचा मुलांशी संवाद थेट दाखवला गेला. राज्यात सर्वत्र त्या उपक्रमाचे जोरदार स्वागत झाले. राज्यातील करोडो लोकांनी थेट लाईव्ह टीव्हीच्या माध्मातून ते भाषण पाहिले, अनुभवले. सर्वच वृत्तपत्रांनी व चॅनेलनी मोदींच्या वक्तव्याची प्रशंसा तर केलीच, पण, चाचा नेहरूंनंतर मुलांशी बोलणारे पहिले पंतप्रधान, असाही नरेंद्र मोदींचा गौरव केला गेला. यातून एक सकारात्मक वलय त्या सार्‍या प्रक्रियेला लाभले आणि त्याचा मोठा परिणाम, निदान महाराष्ट्रातील जनतेवर पुढचा काही काळ राहील हेही उघडच आहे. हे पाहिल्या नंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांनी खडबडून जागे व्हायला हवे होते. त्यांनी तातडीने आपसातील सारे मतभेद मिटवून एक दिलाने मतदारांपुढे जाण्याचा निश्चय करायलाच हवा होता. पण तसे काही होताना दिसत नाही. अजुनी तळ्यात मळ्यात सुरुच आहे. त्यांच्या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने ते दुर्दैवाचेच ठरेल अशी साधार भीती मात्र वाटते आहे. 
 
अनिकेत जोशी