शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: पुणे , शुक्रवार, 12 सप्टेंबर 2014 (09:14 IST)

मी मुख्यमंत्रिपदाची दावेदार नाही : पंकजा मुंडे

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्तेमध्ये माझा सहभाग असेल, पण मुख्यमंत्रिपदाची दावेदार नाही. परंतु महायुतीचा मुख्यमंत्री होणार असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा पालवे- मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून उद्यापासून दुसरा टप्पा सुरु होत आहे, माहिती त्यांनी दिली.

राज्याचे नेतृत्व करण्याचा प्रश्न सध्यातरी नाही असे सांगून त्या म्हणाल्या, मुख्यमंत्रिपदासाठी माझी संघर्ष यात्रा नाही. लोकसभेप्रमाणे महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन होणार, हा विश्वास आहे. पण मुख्यमंत्री महायुतीचाच होणार. आघाडी सरकारने गेल्या काही महिन्यांत जे स्वत:च्या फायद्यासाठी निर्णय घेतले त्याला आमचा विरोध आहे. पण जे निर्णय जनहिताला पूरक आहेत. त्याला विरोध असण्याचे कारण नाही.

सन 1995 मध्ये मुंडे साहेबांनी संघर्ष यात्रा काढली, त्यांनतर राज्यात सत्तांतर झाले. असे एका प्रश्नाला उत्तर देऊन त्या म्हणाल्या. मी सुरु केलेल्या संघर्षयात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून आघाडी सरकारने जो चुकीचा कारभार केला, तो जनतेसमोर मांडण्याचा व भारतीय जनता पक्षाचे व्हिजन मतदारांपर्यंत नेण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणूनच येत्या निवडणुकीत जनतेने महायुतीला संधी द्यावी.

त्यामुळे राज्यात परिवर्तन होईल. मुंडे साहेबांनी युतीला महायुती करण्याचे काम केले. आज त्यांची उणीव जाणवत आहे. पण आमचे सरकार आल्यावर त्यांना अपेक्षित असणारे निर्णय आम्ही घेऊ, व त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणू. त्यासाठी आम्ही सर्वजण काम करीत आहोत. पक्षामध्ये मला संघर्षाची कधी वेळ आली नाही. उलट पक्षानेच मला सावरले. म्हणूनच जनहितासाठी संघर्ष करणार आहे, असे त्यांनी एक प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

महायुतीमधील जागावाटपाचा प्रश्न चर्चेच्या माध्यमरतून सुटणारा आहे. त्यामुळे कोणताही घटक नाराज नाही व आमची महायुती भक्कम आहे. ज्या जागा आजवर कधी जिंकता आल्या नाहीत, अशा जागा जिंकण्यासाठी आम्ही रणनीती करीत आहोत, असे त्या म्हणाल्या.