शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. विंदा करंदीकर
Written By वेबदुनिया|
Last Modified: नागपूर - , बुधवार, 17 मार्च 2010 (12:35 IST)

'विंदां'च्या निधनाने विदर्भात शोक

मराठी साहित्य विश्वाला तिसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच विदर्भातील साहित्यिक आणि सर्वसामान्य जनता शोकसागरात बुडाली. राजकीय क्षेत्रातूनही 'विंदां'च्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. कविता, बालसाहित्य, समीक्षण, अनुवादित साहित्य आदी विविध क्षेत्रात आपली आगळीच छाप पाडणार्‍या एका महान साहित्यिकाला आज महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दात अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राने आज साहित्यातला थोर तपस्वी गमविला आहे, अशा शब्दात आपल्या संवेदना व्यक्त केल्या. कवितांमध्ये सातत्याने नवीन प्रयोग करणे, बाल कवितांना नवा आयाम मिळवून देणे, विविध भाषांमधील चांगले साहित्य मराठीत आणणे यासारखे अनेक प्रयोग त्यांनी केले. भावनांना शब्दबद्ध करण्याची विंदांची क्षमता अफाट होती. आयुष्यभर सामाजिक बांधिलकीने ते साहित्य क्षेत्रात कार्यरत राहिले. मार्क्सवादी विचारांचे असूनही त्यांनी पक्षविरहीत समाजकारण करणार्‍यांना भरघोस मदत केली. त्यांच्या कर्तृत्वापुढे गगनही ठेंगणे होते. हा थोर तपस्वी मराठी साहित्याला आपल्या कविकांचा, साहित्याचा आणि केलेल्या कार्यांचा कायम ठेवा देऊन गेला. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, असेही गडकरी यांनी आपल्या शोकसंवेदनात म्हटले आहे.

विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी विंदांविषयी आपल्या संवेदना व्यक्त करताना साहित्य क्षेत्रातील भीष्माचार्य हरपला, असे सांगितले. २००७ मध्ये आम्ही आयोजित केलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विंदांनी स्वीकारावे, अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. पण, प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते येऊ शकले नव्हते. तथापि, त्यांनी आपले आशीर्वाद पाठविले होते, अशी आठवण म्हैसाळकर यांनी उद्धृत केली.