शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. सावरकर
Written By वेबदुनिया|

सैन्यात शिरा बंदुका हाती घ्या

ND
रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून मुक्त झालेल्या, 26 वर्षानंतर बंदीवासातून सुटलेल्या विचारवंत लेखक, कवी, आणि कृतीवंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतभर ठिकठिकाणी प्रचंड सभांतून सत्कार होऊ लागला. त्यांचे स्फूर्तिदायक विचार ऐकण्यास सहस्त्रावधी लोक जमू लागले. त्यावेळी आपल्या देशात काँग्रेस, हिंदुमहासभा आणि मुस्लिम लीग या तीन मुख्य राजकीय संस्था होत्या. सावरकर आपल्या पक्षांत यावेत म्हणून काँग्रेसने खूप प्रयत्न केला. पण सावरकर काँग्रेसमध्ये गेले नाहीत. त्यांचे म्हणणे होते की काँग्रेसची अहिंसेची नीति देशाला स्वतंत्र करू शकणार नाही आणि तिच्या मुसलमानांपुढे शरणागती पत्करण्याच्या धोरणामुळे देशाचा आणि हिंदूंचा घात होईल. तो टाळावा यासाठी ते हिंदुमहासभेचे कार्य करू लागले. अ.भा. महासभेचे लागोपाठ सात वर्षे 1937 ते 43, सावरकर अध्यक्ष निवडले गेले, सात वर्षात त्यांनी हिंदुमहासभेला देशातील एक मोठी लढाऊ, संघटना म्हणून मान मिळवून दिला.

दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी सावरकरांनी सांगितले, ''तरुणांनो सैनिक व्हा. ब्रिटीशांच्या शाळांतून तुम्ही इंग्रजी, ‍गणित, अभियांत्रिकी शिक्षण घेता. पण केवळ या शिक्षणाने देश स्वतंत्र करता येणार नाही. आजवर ब्रिटीश लोक हिंदू लोकांना शस्त्रास्‍त्रांचे शिक्षण देत नव्हते. त्यांना मोठ्या प्रमाणावर सैन्यात घेत नव्हते. एवढेच नव्हे तर ब्रिटीशांची कुटील राजनिती भारतात एखाद्याला महात्मा बनवून हिंदूना उपदेश करीत असते की मारीत मारीत मरणे हा सद्‍गुण नसून सूत काढणे हाच धर्म आहे! शत्रूला ठार मारणे हा दुर्गूण असून त्यांच्याकडून मारले जाण्यानेच स्वर्ग प्राप्त होतो!! पण आता जर्मनी जपानच्या मार्‍यामुळे ब्रिटीश सरकार स्वत:च अडचणीत सापडले आहे आणि ते तुम्हाला सैनिकी शिक्षण देत आहे ते शिक्षण तुम्ही घ्या. केवळ असहकार आणि अहिंसेने सूत काढून स्वराज्य मिळणार नाही. तर ते इंग्रजांच्या हातून पराक्रमाने हिसकून घ्यावे लागेल. मारता मारता मरणाचीही सिद्धता ठेवावी लागेल! त्यासाठी सैन्यात शिरा बंदुका हाती घ्या आणि मग त्या कोठे फिरवायच्या ते तुम्ही ठरवा!''

स्वातंत्र्य मिळाल
सावरकरांचा हा उपदेश हा मार्ग पुढे सफल झाला. जपानच्या सहाय्याने रासबिहारी बोस यांनी इंग्रजांविरूद्ध उलटलेल्या हिंदी सैनिकांना संघटित करून स्वतंत्र हिंद सेना स्थापन केली. सेनाच अशी इंग्रजांवर बिथरल्याने इंग्रजाला भारत स्वतंत्र करावा लागला. इंग्लँडचे पंतप्रधान एटली यांनी तेथील लोकसभेत मार्च 1947 मध्ये सांगितले की भारतीय सेना आपल्याशी आता एकनिष्ठ राहिली नाही. 1857 प्रमाणे ती स्वातंत्र्योत्सुक झाली आहे आणि आपण येथून नवी सेना तिकडे पाठवू शकत नाही म्हणून हिंदुस्थानला स्वातंत्र्य द्यावे लागत आहे. अशाप्रकारे आपल्या अनुयायांच्या पराक्रमाने, त्यागाने प्रयत्नाने आपला देश, आपली मातृभूती स्वतंत्र झालेली सावरकरांनी पाहिली. स्वातंत्र्याप्राप्तीची त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झालेली पाहून त्यांना कर्तव्यपूर्तीचा परमानंद लाभला.

पण या आनंदावर थोडी दु:खाची छाया पडली होती. ती म्हणजे हिंदुस्थानच्या दोन भागात ईस्लामी राज्य 'पापस्तान' निर्माण झाले होते. संपूर्ण नि अखंड हिंदुस्थान स्वतंत्र झाला नव्हते ऐवढेच नव्हे तर इस्लामी राज्यात रहाणार्‍या हिंदूना तेथून मारून लुटून एक तर मुसलमान व्हा किंवा देशाबाहेर जा असे सांगितले जात होते आणि अशाप्रकारे तिकडून इकडे येणार्‍या हिंदूंना येथेहि आसरा मिळत नव्हता. त्यावेळी सावरकर सांगत होते मुसलमानाशी जशास तसे वागा. तर काँग्रेसचे नेते गांधी, नेहरू म्हणत होते मुसलमानांना दुखवू नका. त्यांना 55 कोटी रुपये द्या. हे गांधींचे सांगणे न पटून गोडसे-आपटे यांनी 30 जानेवारी 1948 ला गांधींना गोळ्या घालून ठार मारले. ते दोघे सावरकरांचे कट्टर अनुयायी होते म्हणून सावरकरांनाही गांधी वधात एक आरोपी म्हणून गुंतवले गेले. या आरोपातून ते फेब्रुवारी 1949 मध्ये निष्कलंक सुटले आणि डिसेंबर 1949 मध्ये ते पुन्हा हिंदू महासभेच्या कलकत्ता येथे झालेल्या अधिवेशनास उपस्थित राहिले. या अधिवेशनानंतर बंगाली हिंदूंनी तेथे घुसलेल्या पाकिस्तानी मुसलमानांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस शासनाने सावरकरांना पुन्हा अटक करून 100 दिवस बंदिवासात ठेवले. एक वर्ष राजकारणात भाग न घेण्याचा अटीवर त्या बंदिवासातून सावरकरांना सोडण्यात आले.