शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. सावरकर
Written By

स्वातंत्र्वीर सावरकर : तेजस्वी लेखक

उत्कट देशभक्त, जहाल क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता हे कुणाला खरे वाटणार नाही. स्वा. विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे त्यांचा 28 मे 1883 रोजी जन्म झाला. त्यंची आज जयंती त्या निमित्त..

सावरकरांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी सशस्त्रक्रांतीची शपथ घेतली. ‘जयोस्तुते’ हे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र वयाच्या 20 व्या वर्षी लिहिले. पुण्याला फर्म्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच विदेशी कापडांची होळी करून जनजागृती केली. 9 जून 1906 मध्ये लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन ते लंडनला गेले. तेथे त्यांनी भारतीयांना एकत्र करून तेथून देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले.

1909 मध्ये बॅरिस्टर परीक्षा पास होऊनही पदवीस नकार दिला. सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तुलानेच हुतात्मा अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला. याबाबत सावरकरांना अटक झाली. पॅरिसहून लंडनला येताना मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी टाकून निसटण्याचा ऐतिहासिक, धाडसी प्रयत्न त्यांनी केला. अखेर दोन जन्मठेप व काळ्यापाण्याची शिक्षा त्यांना झाली. त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनाही काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती. अंदमानला त्यांचे अमानुष हाल झाले पण तरीही तेथे लिहिण्याचे कोणतेही साधन नसताना काळ कोठडीच्या भिंतीवर कोळशानी त्यांनी महाकाव्य लिहिले.

काळ्यापाण्यातून सुटका होऊन रत्नागिरीला आल्यावर त्यांनी समाजसुधारणेसाठी सहभोजन, पतितपावन मंदिर, अस्पृश्यता निवारक परिषद, महार परिषद असे कार्यक्रम करून विरोधाची पर्वा न करता जागृती केली. 1937 ला विनाअट संपूर्ण मुक्तता झाल्यावर हिंदू महासभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 1940 मध्ये सुभाषचंद्र बोस व सावरकर यांची ऐतिहासिक भेट झाली. क्रांतिकार्यासाठी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराची सांगता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 10 मे 1952 ला केली.

स्वातंत्त्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तीमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पाश्र्वभूमीवर आधारित कादंबर्‍यांचा लेखक ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांचा कविता महाविद्यालात, लंडनच्या वास्तवत, अंदमानच काळकोठडीत आणि रत्नगिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतीवर महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, मार्दव व माधरु ही त्यांच्या काव्याची वैशिष्टय़े. 22 व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला होता.

आयुष्याचा क्षणन् क्षण आणि शरीराचा कणन् कण त्यांनी केवळ देशासाठी अर्पण केला. आधुनिक दधिची असलेल्या या महापुरुषाने अन्नत्याग करून 26 फेब्रुवारी 1966 मध्ये देहत्याग केला.