मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By wd|
Last Modified: पंढरपूर , बुधवार, 9 जुलै 2014 (10:00 IST)

पंढरीत भक्तीचा महापूर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा
राज्यात पावसाने ओढ दिल्याने यांच्याच्या आषाढी महासोहळ्यावर याचा परिणाम दिसून येत असून यंदा गर्दी कमी आहे. पंढरीत दशमीपर्यंत किमान सात लाख भाविक दाखल झाले असावेत असा अंदाज आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठल व रखुमाईची महापूजा करणार आहेत.

आषाढी सोहळ्यासाठी पंढरीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालखी सोहळे पंढरीत दाखल झाल्यानंतर येथे भाविकांची गर्दी झाल्याचे  दिसत आहे. दरमन, गतवर्षीच्या तुलनेत यात्रा कमी भरली आहे. प्रतिवर्षी किमान दहा लाख भाविक या यात्रेस येतात व प्रशासन ही एवढी संख्या गृहीत धरून नियोजन करीत असते मात्र यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्याने याचा परिणाम आषाढी यात्रेवर झाला आहे. य सोहळ्यास अंदाजे सात लाख भाविक आले असावेत असा अंदाज आहे. पालख्यांसमवेत असणार्‍या भाविकांमध्ंस यंदा घट दिसून आली आहे.

आषाढी दशमी दिवशी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळे वाखरीतून पंढरीत दाखल झाले आहेत. येथील वातावरण विठूमय झाले असून हरिनामाचा गजर सर्वत्र सुरू आहे. चंद्रभागा वाळवंटात भाविकांची दाटीवाटी असून पवित्र स्नानासाठी गर्दी उसळली होती. श्री विठ्ठलाच पदस्पर्श दर्शन रांगेत भाविकांची संख्या वाढली असून गोपाळपूरच्या पुढे इंजिनिअरिंग कॉलेजकडे ती पोहोचली आहे. सुमारे एक ते सव्वा लाख भाविक रांगेत असावेत असा अंदाज आहे.

आज एकादशी दिवशी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सपत्नीक श्री विठ्ठल व रूक्मणी मातेची शासकीय महापूजा करणार आहेत. यासाठी मंदिर समितीने तयारी केली आहे. बुधवारी रात्रौ 1 ते 1.30 खाजगीवाले यांची पाद्यपूजा, 1.30 ते 2.30 नित्य पूजा, 2.30 ते 2.55 विठ्ठलाची महापूजा तर 3 ते 3.20 रूक्मिणी महापूजा, 3.25 ते 4 या वेळात मानाचा वारकरी व मुख्यमंत्री यांचा सत्कार सोहळा होणार आहे. पहाटे एक ते चार या काळात दर्शन बंद राहणार आहे.

दरम्यान, आषाढी एकादशीसाठी मंदिर समिती, महसूल, नगरपरिषद, पोलीस यासह सर्वच शासकीव विभागांनी नियोजन केले आहे. यंदा मोठा बंदोबस्त यात्रेसाठी देण्यात आला आहे. एक जिल्हा पोलीस अधीक्षक, पाच अतिरिक्त अधीक्षक यासह तीनशे अधिकारी, तीन हजार पोलीस, एक हजार गृहरक्षक, नऊ राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा व 8 बॉम्ब शोधक व निकामी करणारी पथके, श्वान पथके यासह घातपातविरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणाची तपासणी घातपातविरोधी पथके रोज करीत आहेत.

याचबरोबर यंदाच्या आषाढी यात्रेसाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चार हजार शौचालये पंढरीत उभारण्यात ली आहेत. याचा वापर भाविकांनी करावा असे आवाहन प्रशासनाचवतीने करण्यात आले आहे. शहरात स्वच्छता व नियोजन राहावे तसेच कामात सुसूत्रता असावी यासाठी चार मुख्याधिकारी नेमण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यासह 150 वैद्यकीय अधिकारी आरोग्य   सुविधा देत आहेत. अग्निशामकदल, अँम्बुलन्स यांची सोय शहरात करण्यात आली आहे. शंभर खाटांचे कॉलरा रुग्णालय सुरू करण्यात  आले आहे. वरिष्ठ अधिकारी पंढरीत तळ ठोकून बसले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांचा यात समावेश आहे.