शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योग सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 मे 2014 (10:26 IST)

ध्यानानं बाजूला सारता येते धूम्रपानाची सवय!

अमेरिकेतल्या काही मानसशास्त्रज्ञांनी ध्यानाची नवीन पद्धती विकसित केली असून तिच्या माध्यमातून धूम्रपानाचे प्रमाण कमी होऊ शकते, असा दावा केला आहे. इंटिग्रेटिव्ह बॉडी माईंड ट्रेनिंग (आयबीएमटी) असे या नव्या पद्धतीचे नामकरण करण्यात आले असून ध्यानाचे हे प्रशिक्षण दिलेल्या व्यसनी लोकांचे काही दिवसांच्या साधनेनंतर 60 टक्के धूम्रपान कमी झाले असल्याचे त्यांना आढळले आहे. मनाच्या शक्तीचा योग्य उपयोग करण्याच्या ध्यानाच्या या नव्या तंत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी काही विशिष्ट धूम्रपान करणार्‍या व्यक्तींची निवड करण्यात आली होती. ज्यांना सिगारेट सोडण्याची तीव्र इच्छा आहे अशाच लोकांना हे प्रशिक्षण देण्यात आले.धूम्रपान सोडण्याची तीव्र इच्छा आणि आपण ते सोडू शकतो अशी सकारात्मक विचारसरणी ही या प्रशिक्षणाची पूर्व अट आहे. म्हणजे या प्रयोगामध्ये सकारात्मक विचाराचा वापर करण्यात आलेला आहे. अमेरिकेतल्या संशोधकांनी 27 धूम्रपींवर हा प्रयोग केला. या लोकांचे सरासरी वय 21 वर्षे होते आणि ते दररोज सरासरी 10 सिगारेट ओढत होते. त्यातल्या 15 लोकांना आयबीएमटीचे प्रशिक्षण देण्यात आले आणि बाकीच्या 12 लोकांवर धूम्रपान मुक्तीच्या अन्य उपायांचा प्रयोग करण्यात आला.

तेव्हा आयबीएमटीचे प्रशिक्षण घेणार्‍यांचे सिगारेट ओढणे मोठय़ा प्रमाणावर कमी झालेले दिसून आले. या ध्यानाच्या प्रकारात धूम्रपींचे आपल्या मनावरचे नियंत्रण वाढते असे आढळून आले.