सांवरिया : निर्मल प्रेम निर्माता : संजय लीला भन्साळी दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी संगीत : मॉंटी शर्मा कलाकार : रणबीर कपूर, सोनम कपूर, सलमान खान, रानी मुखर्जी, जोहरा सहगल
'सांवरिया ही तारूण्यात पदार्पण केलेल्या दोन जीवांची प्रेमकहाणी आहे. त्यांच्या प्रेमात उत्कट भावना, भोळेपणा, प्रेमासाठी प्रसंगी स्वतःला संपविण्याचीही तयारी आहे. राज (रणबीर कपूर) एक चित्रकार आहे. त्याच्यात प्रचंड उत्साह आहे. त्याचे काही आदर्श व स्वप्न आहेत. तो एका निसर्गरम्य शहरात येऊन पोहोचतो. हे शहर स्वप्नाप्रमाणेच असते. एक चित्रकार ज्या जगात वावरतो अगदी तसेच हे शहर असते.
तेथे त्याला एका रात्री सकीना (सोनम कपूर) भेटते. पण दोघांचे स्वभाव भिन्न असतात. सकीना गप्प व उदास राहणारी मुलगी आहे. तिच्या उदासीमागे रहस्य दडल्यासारखे वाटत रहाते. तिच्या मनाचा वेध घेणे राजला खूप अवघड जाते. पण या प्रवासातच दोघेही परस्परांवर प्रेम करू लागतात.
पण त्यांच्या प्रेमाला एके दिवशी दृष्ट लागते. सकीनाचे पूर्वायुष्य अगदीच अकल्पितपणे राजच्या समोर येते आणि तो हादरतो. दोघांची मैत्री तुटते. या दोघांच्या प्रेमातून संजय लीला भन्साळी यांनी प्रेम, त्यातील कारूण्य, प्रेमी जीवांच्या ह्रदयाची कोमलता असे सारे अतिशय तरलतेने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
|