निर्माता :आशुतोष गोवारीकर - रॉनी स्क्रूवाला दिग्दर्शक :आशुतोष गोवारीकर संगीत : ए.आर.रहमान कलाकार :हृतिक रोशन, ऐश्वर्या राय, कुलभूषण खरबंदा, इला अरुण, सोनू सूद
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा बहुचर्चित 'जोधा अकबर' सोळाव्या शतकातील बादशहाच्या प्रेमकथानकावर आधारलेला आहे. मोगल बादशहा अकबराची भूमिका हृतिक रोशन आणि रजपूत राजकुमारीच्या भूमिकेत ऐश्वर्या रॉय आहे.
महत्त्वाकांक्षी सम्राट अकबराची राज्याच्या विस्ताराची मनोकामना असते. मात्र रजपुतांच्या सामर्थ्याची त्यास माहिती होती. यासाठी रजपूत राजा भारमलची मुलगी जोधाशी लग्नाचा प्रस्ताव तो स्वीकारतो. रजपुतांबरोबरच्या संबंधाबरोबरच विभिन्न धर्म व संस्कृतीत सामंजस्याचा धोरणीपणा त्यामागे असतो. मात्र 'मोहरा' बनण्यास जोधाचा विरोध असतो. जोधाचे प्रेम प्राप्त करण्याचा प्रवास म्हणजेच हा चित्रपट.
जोधा अकबराचे यश यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.... हृतिक रोशन : सुपरहिरोच्या भूमिकेत आजपर्यंत प्रेक्षकांसमोर आलेल्या हृतिकचा अकबराच्या भूमिकेत प्रेक्षक स्वीकार करणार नाहीत, असे सर्वांचेच मत आहे. अकबराची भूमिका त्याच्या इमेजच्या विरोधात असल्याने अशा प्रकारची भूमिका करणे हे त्याच्यासमोर एक आव्हानच आहे. चित्रपटाचे यश-अपयश त्याच्या करिअरवर महत्त्वाचा प्रभाव पाडू शकते.
आशुतोष गोवारीकर : दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासाठीदेखील हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा आहे. 'लगान' च्या यशानंतर आशुतोषने 'स्वदेश' मध्ये अपयश चाखले आहे. 'लगान'च्या यशामध्ये आमिरचा सिंहाचा वाटा असल्याचे म्हटले जाते. 'स्वदेश'च्या अपयशाने या गोष्टीला अजून बळकटी मिळते. आशुतोष हा भ्रम 'जोधा अकबर' ने तोडू इच्छित असेल.
|