निर्माता : अरिंदम चौधरी दिग्दर्शक : रजत कपूर संगीत : सागर देसाई कलाकार : रणवीर शौरी, नेहा धुपिया, नसीरूद्दीन शहा, हर्ष छाया, सौरभ शुक्ला, विनय पाठक, इरावती हर्षे, ब्रिजेन्द्र काला
रजत कपूर दिग्दर्शित 'मित्थ्या' बघताना अमिताभ अभिनित 'डॉन'ची आठवण येणे स्वाभाविक आहे. कारण कथेचा मुख्य आधारच मुळात डॉनच्या कथेशी मिळता-जुळता आहे. मध्यंतरानंतर मात्र लेखक रजत कपूर आणि सौरभ शुक्ला यांनी कथेला जबरदस्त वळण दिले आहे. इथूनच 'मिथ्या', 'डॉन' पासून वेगळा वाटायला लागतो.
रजत कपूरने ही कथा जवळपास दहा वर्षांपूर्वीच लिहिली होती. मात्र, या चित्रपटावर पैसे लावायला कोणीही तयार नव्हते. आता वेगळ्या वाटेवरून जाणारे चित्रपट प्रेक्षकांकरवी पसंत केले जातात, त्यामुळे मिथ्यासारखे चित्रपट प्रेक्षकांसमोर यायला लागले आहेत.
चित्रपटात अभिनेता बनण्यासाठी आलेल्या रणवीर शौरीचा चेहराच त्याचा शत्रू बनतो. कारण त्याचा चेहरा हुबेहूब एका गुंडासारखा असतो. ही गोष्ट विरोधी पक्षातील गुंडांना कळते तेव्हा त्या गुंडाची हत्या करून त्याच्याजागी रणवीरला आणतात. या दरम्यान एक दुर्घटना घडते आणि रणवीरची स्मरणशक्ती जाते. त्याचे कुटुंबीय इतरांपासून ही गोष्ट लपवून ठेवतात. डॉनच्या पत्नीवर आणि मुलांवर रणवीर प्रेम करायला लागतो. हे खोटे जग त्याला खरे वाटू लागते.
विरोधी गुंडांना रणवीरकडून काहीच मदत मिळत नसल्यामुळे ते त्याचे गुपित उघड करतात. शेवटी रणवीरला गोळी मारून त्याला संपवायचा प्रयत्न करतात. मात्र त्या दरम्यान त्याची स्मरणशक्ती परत येते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
रणवीरची स्मरणशक्ती गेल्यावर पुढे काय होईल ही उत्सुकता वाटत राहते. पुढे काय होईल याचा अंदाज लावणे कठीण होते. त्यामुळे चित्रपटातील रुची वाढते. पण काही ठिकाणी चित्रपटाची गती मंदावते.
चित्रपटाची कथा इतर मसाला चित्रपटासारखीच असली तरी सादरीकरण प्रयोगात्मक आहे. एका सामान्य कथेला चांगल्या पद्धतीने सादर केले आहे. याचे श्रेय दिग्दर्शक रजत कपूरला जाते. हास्य आणि थरार यात संतुलन साधले आहे. विनोदनिर्मिती करण्यासाठी जबरदस्तीने काही दृश्ये घुसडली आहेत, असे कुठेही जाणवत नाही.
लेखनात थोड्याफार त्रुटी असल्या तरी त्या चतुराईने लपविण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ रणवीरला गुंड बनवून त्याच्या घरी जाणे, ही गोष्ट कोणालाच न कळणे, स्मरणशक्ती गेली असली तरी ही गोष्ट बाहेरच्या व्यक्तीला न कळणे हे सर्व प्रसंग हलक्या-फुलक्या पद्धतीने सादर केले आहेत.
चित्रपटात सगळ्यांचा अभिनय छान झाला आहे. रणवीर शौरीचा अभिनय छान आहे. हास्य, भीती, प्रेम या भावना त्याने पडद्यावर जिवंतपणे मांडल्या आहेत. नसीरूद्दीन शहाबद्दल काय बोलावे? तो एक परिपक्व अभिनेता आहे. नेहा धुपिया चांगल्या दिग्दर्शकाकडे छान अभिनय करू शकते. सौरभ शुक्ला, विनय पाठक, हर्ष छाया, इरावती हर्षे, बिजेंद्र काला यांचाही अभिनय चांगला आहे. बॅकग्राउंड म्युझिक उल्लेखनीय आहे.
एकूणात काय तर मिथ्या वेगळ्या पद्धतीचा चित्रपट असून तसे चित्रपट आवडणार्यांना हाही आवडेल.
|