मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > चित्रपट समीक्षा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जोधा-अकबर- पावणेचार तासाचा 'हॅंगओव्हर'
PR
निर्माता :आशुतोष गोवारीकर-रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक :रॉनी स्क्रूवाला
संगीत :ए. आर. रहमान
कलाकार :हृतिक रोशन, ऐश्वर्या राय, सोनू सूद, कुलभूषण खरबंदा, इला अरुण, निकितिन धीर, प्रमोद माउथो

बॉलीवूडमधील अभ्यासू दिग्दर्शकांमध्ये आशुतोष गोवारीकरचा समावेश होतो. इतरांपेक्षा त्याचे चित्रपट नक्कीच वेगळे असतात. 'लगान', 'स्वदेस' यानंतर आता 'जोधा-अकबर' ही प्रेमकथा घेऊन आशुतोष प्रेक्षकांसमोर आला आहे.

सोळाव्या शतकातील ही वादग्रस्त प्रेमकथा त्याने पडद्यावर साकारली आहे. ऐतिहासिक चित्रपट असल्याने तो भव्य दिव्य असणे अपेक्षित असते. तसा तो आहेही. पण तब्बल पावणेचार तासांची लांबी मात्र शेवटी शेवटी असह्य होते. लांबी कमी केल्यास हा चित्रपट नक्कीच आहे, त्यापेक्षा चांगला होऊ शकेल.

चित्रपटाची सुरुवात युद्धाने होते आणि सुरुवातीलाच या चित्रपटाच्या भव्यतेचा अनुभव येतो. या युध्दाचे चित्रीकरण छान केले आहे. यानंतर बालपणातील अकबर पडद्यावर प्रवेश करतो. अकबर युद्धाच्या विरोधात असतो. त्यानंतर कथा एकदम पुढे होऊन थेट तरूण झालेला अकबर (हृतिक रोशन) दाखविला आहे.

PR
आमेरचा राजा भारमल (कुलभूषण खरबंदा) आपल्या प्रजेच्या हितांसाठी मोगलांशी मैत्री करण्याचा निर्णय घेतो. त्यासाठी आपली मुलगी जोधाशी (ऐश्वर्या) अकबराने लग्न करावे अशी त्याची इच्छा असते. अकबर जोधाला न बघताच तिच्याशी निकाह करण्याचा निर्णय घेतो. पण स्वाभिमानी जोधा निकाह करण्याआधी अकबरासमोर दोन अटी ठेवते. त्यातील पहिली अट म्हणजे ती आपला धर्म बदलणार नाही आणि अकबराच्या राजवाड्यात तिच्यासाठी एक मंदिर बांधावे. अकबर दोन्ही अटी कबूल करतो. पण एका हिंदू मुलीशी निकाह करण्यामुळे त्याला कट्टरपंथियांच्या नाराजीचा सामना करावा लागतो.

पण विवाहानंतरही जोधा अकबरापासून लांब राहणेच पसंत करते. त्यानंतर या दोघांच्या मीलनाचा प्रवास आणि त्यात येणारे अडसर, राजकीय षडयंत्रे ही उपकथानके त्या मागोमाग येतात.

चित्रपटात अकबर आणि जोधा यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला आहे. अकबर न्यायप्रिय असण्यासोबतच सर्व धर्मांचा आदर करतो. त्याला तसे करण्यात जोधाची भूमिका महत्त्वाची असते. हे अधोरेखित करण्यसाठी 'फतह करना और मन जीतना दोनो अलग अलग बात है' हे जोधाच्या तोंडचे वाक्य परिणामकारक आहे. जोधाच्या या भूमिकेमुळे अकबर सामान्य प्रजेची दुःखे जाणून घेतो. हिंदू यात्रेकरूंवर लागणारे कर बंद करतो. प्रजेचे मन जिंकतो. तो संपूर्ण हिंदुस्तानालाच आपले राज्य मानतो.

त्याचवेळी जोधाच्या नसानसात स्वाभीमान भिनला आहे. न घाबरता सम्राट अकबरासमोर आपल्या अटी घालून लग्न करणे आणि त्या मान्य करून घेणे यात तिच्यातील करारीपण आणि स्वाभीमान दिसून येतो. तलवारबाजी आणि घोडेस्वारीत निपुण जोधा एक बहादूर स्त्री होती.

PR
आशुतोष गोवारीकरचा हा चित्रपट भव्य-दिव्य आहे. चित्रपट पाहताना त्यांने या विषयावर अभ्यास केला आहे, याची खात्री पटते. पण तरीही काही त्रुटी जाणवतातच. पटकथा चांगली असली तरी चित्रपटात नाट्यमयता जेवढी हवी तेवढी नाही. त्यामुळे चित्रपट सरळसोट पुढे जात रहातो. जोधा-अकबराची प्रेमकथा चांगली आहे पण हृदयाला स्पर्श करीत नाही. आशुतोषने त्या काळातील परिस्थितीत डोकावण्याचा प्रयत्नच केला नाही.

ऐतिहासिक चित्रपटांची वैशिष्टये म्हणजे पल्लेदार संवाद. जोधा- अकबर इथे फारच कमी पडतो. टाळ्याखाऊ संवादच यात नाहीत. मुगले आझम आठवला तरी त्यातील संवाद पटकन आठवतात. हेच चित्रपटाचे यश असते. चित्रपटातील काही दृश्ये उल्लेखनीय आहेत. जोधाने अकबराचे नाव लिहिणे, पण अशिक्षित असणार्‍या अकबराला ते वाचता न येणे, जोधाला ते वाचायला सांगितल्यावर एका हिंदू स्त्रीने आपल्या पतीचे नाव कसे उच्चारावे या कात्रीत अडकणे, निकाह करण्याआधी अकबरासमोर अटी ठेवणे, जोधाचे अकबरासाठी स्वयंपाक तयार करणे ही दृश्ये छान जमली आहेत.

अकबराच्या रूपात हृत‍िक तितका शोभत नाही. पहिल्या तासभर तर तो ह्रतिकच ऐतिहासिक कपड्यात वावरतोय असे वाटते. शेवटी त्यानंतर तो अकबर आहे, असे समजण्याची सवय होऊन जाते. ऐश्वर्या रायने मात्र अभिनयाच्या बाबतीत ह्रतिकवर मात केली आहे. अभिनयाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास 'जोधा अकबर' ऐश्वर्याचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरायला हवा.

सोनू सूद (राजकुमार सुजामल), इला अरुण (महाम अंगा), कुलभूषण खरबंदा (राजा भारमल), निकितिन धीर (शरीफुद्दीन), उरी (बैरम खान), प्रमोद माउथो (टोडरमल) यांचा अभिनय चित्रपटाला साजेसा आहे. नीता लुल्लाची वेशभूषा उल्लेखनीय आहे. किरण देओहंसचे कॅमेरावर्क आंतरराष्ट्रीय स्तराचे आहे.

ए. आर. रहेमानचे संगीत चित्रपटात पाहताना जास्त चांगले वाटते. 'जश्ने बहारा', 'अजीम ओ शान शहंशाह', आणि 'स्वाजा मेरे स्वाजा' ही गीते ऐकण्यासारखी आहेत.

चित्रपटाची लांबी जास्त वाटते. पण चित्रपट बघताना कंटाळा येत नाही. 'जोधा अकबर' एकदा नक्कीच पहायला हवा. सर्व काही आपल्या डोळ्यांदेखत घडत असतानाही आपण सोळाव्या शतकात पोहचलो असा फील हा चित्रपट देतो.
आणखी
सर्व काही 'मित्थ्या' नाही
'रामा-रामा' पती-पत्नीचा फुटकळ 'ड्रामा'
'संडे' धमाल मनोरंजन
बॉम्बे टू बॅंकॉक : कंटाळवाणा प्रवास
हल्ला बोल : स्वत्वाच्या जाणीवेचा प्रवास
कलियुगात आलेला 'हनुमान'