निर्माता : कुमार मंगत - सुनील लुल्ला दिग्दर्शक : अश्वनी धीर संगीत : राघव कलाकार : तुषार कपूर, इशा देओल, सुनील शेट्टी, समीरा रेड्डी, परेश रावल, नीतू चन्द्रा, उपेन पटेल, तनीषा, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, मनोज पाहवा
शेक्सपियर हा जगातला असा नाटककार आहे, ज्याची साहित्यकृती जगभरातील विविध भाषांच्या माध्यमातून वेगवेगळ्या फॉर्ममधून लोकांपर्यंत पोहोचली आहे. भारतीय चित्रपट आणि नाट्यसृष्टीवरही शेक्सपियरचा मोठा प्रभाव आहे. विशाल भारद्वाजचा नुकताच येऊन गेलेला 'ओंकारा' हा शेक्सपियरच्याच ऑथेल्लोची भारतीय आवृत्ती होता. बुद्धिजीवी प्रेक्षकांना तो आवडालाही होता.
सध्याची विनोदी चित्रपटांची लाट पाहून काहींनी आता शेक्सपियरच्या विनोदी नाटकांना हात घातला आहे. शेक्सपियरच्या 'कॉमेडी ऑफ एरर्स'वर आधारीत 'वन टू थ्री' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण विनोदाचे शिवधनुष्य (तेही शेक्सपियरच्या) पेलणे सोपे नसते हे दिग्दर्शक अश्विनी धीरच्या आता लक्षात आले असेल. वास्तविक याच कथानकावर आधारीत 'दो दुनी चार' आणि 'अंगूर' हे चित्रपट आधीच येऊन गेले आहेत. त्यातही अंगूर लोकांच्या चांगलाच लक्षात आहे. विशेषतः संजीव कुमारचा त्यातील लाजबाब अभिनय अविस्मरणीय आहे.
त्यामुळे 'वन टू थ्री' ची कथाही तीच आहे. एकाच नावाच्या तीन वेगळ्या व्यक्ती काही कारणाने एकाच हॉटेलात एकत्र येतात. लक्ष्मीनारायण (तुषार कपूर, सुनील शेट्टी, परेश रावल) हे त्यांचे नाव. तिघांना एक पत्र मिळते. पण एकच नाव असल्यामुळे त्या पत्रांची अदलाबदल होते. या एका ओळीच्या कथेवर चित्रपटाचा हास्यडोलारा रचला आहे.
विनोदी चित्रपटाला कथा चांगली असली तर मजा येते. केवळ संवाद आणि प्रसंगाच्या माध्यमातून चित्रपट पुढे नेता येतो, पण त्याचा ठसा उमटत नाही. 'वन टू थ्री' मध्ये तेच झाले आहे. सवांद हीच या चित्रपटातील सर्वांत जमेची बाब आहे. पण केवळ संवादाच्या आधारे विनोद निर्मिती करणे प्रत्येक वेळी शक्य नसते.
प्रेक्षकांना हसविणे हाच 'वन टू थ्री'च्या दिग्दर्शकाचा मुख्य उद्देश आहे. या चित्रपटातील परेश रावलची भूमिका अंतर्वस्त्रांचा व्यापार करणार्या व्यक्तीची आहे. एकूणातच त्याला चित्रपटात खूप वाव दिला आहे. ते त्याची विनोदातील दादागिरी पाहता चुकही नाही.
भूमिकांनुसार कलाकार निवडण्याचे श्रेय अश्विन धीरला दिले पाहिजे. त्याची निवड योग्य आहे. त्यांचे सादरीकरणही त्याने छान केले आहे. संजय मिश्रा याला जुन्या काळातील खलनायक 'जीवन' चे बेअरींग दिले ते मजा आणते.
चित्रपटाची लांबी आणि संगीत हे नकारात्मक पैलू आहे. त्यामुळे काही ठिकाणी चित्रपटाची गती मंदावते. सुनील शेट्टीचे 'लेफ्ट राइट' वाले संवादही अती झाल्याने वैताग आणतात.
अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास तुषार कपूर मुळातच विनोदी दिसतो. त्यामुळे त्याच्याकडून विनोदाची अपेक्षा काय करणार? त्यामुळे संपूर्ण चित्रपट खेचून नेण्याची जबाबदारी परेश रावल आणि सुनील शेट्टी यांनी पार पाडली आहे.
नायिकांना चित्रपटात फारसा वावच नाही. इशा देओल आधीच सुमार दिसते. त्यात तिचा मेकअप फारच खराब वाटला. समीरालाही जास्त संधी नाही. या दोघा नायिकांपेक्षा इंन्स्पेक्टरच्या भूमिकेतील नीतू चंद्रा बाजी मारते. तनिषा आणि उपेन पटेल गर्दीत उभे असल्यासारखे वाटतात. संजय मिश्रा, मनोज पाहवा, व्रजेश हीरजी आणि मुकेश तिवारी ठीक.
थोडक्यात जर तुम्हाला थोडे रिलॅक्स व्हायचे असेल किंवा हसायचे असेल तर 'वन, टू थ्री' एक चांगला टाईमपास आहे.
फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...
|