निर्माता- आदित्य चोप्रा दिग्दर्शक- विजय कृष्ण आचार्य संगीत- विशाल शेखर कलाकार- अक्षय कुमार, करीना कपूर, सैफ अली खान व अनिल कपूर.
'टशन' हा आजच्या काळातला चित्रपट असला तरी त्याची कथा मात्र ७०-८० च्या दशकातील आहे. मुलगा लहान असताना त्याच्या बापाची हत्या होते. पण मुलाने मारेकर्याला पाहिलेले असणे. त्यानंतर मोठा झाल्यानंतर त्याने बापाच्या हत्येचा सूड घेणे या साच्यातल्या कथा त्या जमान्यात होत्या. त्यात मसाला म्हणून काहीही असायचे. गोळ्यांचा पाऊस पडूनही त्यातून वाचणारा हिरो, पोलिस अधिकार्याला वेषांतर करून मुर्ख बनविणारा हिरो आणि पिंप, खोके यांच्या गराड्यात रहाणारा खलनायक, मग त्याच्याशी मारामारी करताना बदाबदा कोसळणारी खोकी, पिंपे असलं काहीही दाखवलंय जायचं.
आता याच कथेवर आणि त्याच पद्धतीने आज चित्रपट काढला तर काय होईल? 'टशन'चे तेच झाले आहे. सगळा घिसापीटा फॉर्म्युला दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी 'टशन'मध्ये वापरला आहे. कथा आणि पटकथाही त्यांचीच आहे. त्यामुळे या चित्रपटाचा जो काही गोंधळ घातलाय तो सर्वस्वी विजय कृष्ण आचार्य यांचा आहे. दुय्यम दर्जाची कहाणी, ज्याला काहीही तार्किकता नाही, उगाचच्या उगाच काही तरी स्टायलिश म्हणून दाखविण्याचा प्रयत्न यात चित्रपट पार हरवून गेला आहे. विशेष म्हणजे यशराज फिल्म्ससारख्या बड्या बॅनरने असा चित्रपट का केला असा प्रश्न पडतो.
चित्रपटाची कथा अशी आहे. पूजा सिंहला (करीना कपूर) पित्याच्या हत्येचा बदला घ्यायचाय. तिच्या पित्याचा मारेकरी आहे, भैय्याजी (अनिल कपूर). भैय्याजीचे २५ कोटी रूपये चोरण्यासाठी ती जिमीची (सैफ अली खान) मदत घेते. जिमीशी प्रेमाचे नाटक करून ती पंचवीस कोटी रूपये घेऊन रफूचक्कर होते.
तिकडे भय्याजी पैसे वसूल करण्याची जबाबदारी कानपूरमध्ये रहाणार्या बच्चन पांडेवर ( अक्षय कुमार) सोपवतो. पूजा त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवायला पहाते. पण तो तिचा लहानपणापासूनचा प्रियकर असल्याचे तिच्या लक्षात येते आणि मग काय बच्चन, पूजा आणि जिमी मिळून भय्याजी व त्याची गॅंग संपवतात.
चित्रपटाचे शूटींग लड्डाख, केरळ, हरिद्वार व ग्रीसमध्ये केले गेले आहे. लोकेशन अतिशय छान आहेत. पण हरिद्वार आणि राजस्थान सुरू असताना ग्रीसमधलं लोकेशन दिसतं आणि सगळंच हास्यस्पद होऊन जातं.
चित्रपटात भय्याजीची पॅंट सारखी खाली घसरताना दाखवली आहे. भय्याजी त्याला सारखे वर करू पहातो. 'टशन' या चित्रपटाचे सार हेच आहे. कथा सारखी भरकटत जाते आणि तिला रूळावर आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. पण ते शेवटपर्यंत शक्य होत नाही.
क्लायमॅक्सला तर हसावं की रडावं तेच कळथ नाही. अक्षयची जमिनीवर चिनी लोकांशी मारामारी होते. दुसर्याच दृश्यात तो लाईटच्या खांबावरून मारामारी करताा दाखवला आहे. सैफ अली खान बोटीवर जाऊन अनिल कपूरला बदडतो. तर दुसर्याच दृश्यात अनिल कपूर सायकल रिक्षावरून जाताना दिसतो. कशाचा कशाला ताळमेळ नाही.
त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणजे अक्षय कुमार व करीना कपूरचा अभिनय. करीनाला समोर ठेवून पटकथा लिहिली आहे. या चित्रपटासाठी करीनाने 'झीरो फिगर' बनवली आहे. ती वारंवार दाखविण्याचा अट्टाहास केला गेला आहे. पण ते वगळले तर अभिनयात करीना बाजी मारते. एक्शन व विनोद अशी मिश्र भूमिका अक्षयने चांगली पार पाडली आहे. विशेषतः त्याची बॉडी लॅंग्वेज फारच उत्तम.
सैफला फारसा वाव नाही. अनिल कपूरचे हिंग्लिश संवाद डोके उठवतात. त्याचा अभिनय चांगला आहे. पण एकूणातच भूमिका बकवास आहे. विशाल शेखरचे संगीत 'पहायला' चांगले आहे.
'टशन'ची टॅग लाईन 'दा स्टाईल, द गुडलक, द फॉर्म्युला अशी आहे. पण चित्रपटात यातलं काहीही नाही.
|