निर्माता : मुकेश भट्ट दिग्दर्शक : कुणाल देशमुख संगीत : प्रीतम, कामरान अहमद कलाकार : इमरान हाशमी, सोनल चौहान, जावेद शेख, समीर कोचर, विशाल मल्होत्रा ए-सर्टिफिकेट * 15 रील
'जन्नत' चा आणि क्रिकेटचा फारसा काहीही संबंध नाही, हे पहिल्याछूट सांगून टाकतो. कारण गेल्या काही दिवसांपासून तो 'किसाळ' इमरान हाशमी या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आयपीएलच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये दिसतो आहे. त्यावरून उगाचच काहींना वाटेल की हा चित्रपट क्रिकेटवर आधारलेला आहे. पण तसे बिल्कूल नाही.
ही एक प्रेमकथा आहे. तीच घिसीपीटी. पण थोड्या वेगळ्या तेलात तळलेली. प्रियकर-प्रेयसी, मग त्यांच्या प्रेमाला होणारा विरोध, कधी आई-बापांचा तर कधी परिस्थितीचा. पण हे जुने फंडे आता फारसे दिसत नाही. आणि ते दाखवले ते प्रेक्षक येणार नाही. म्हणून भट्ट कॅंपने थोडा वेगळा विचार केलाय. प्रेमात अडसर म्हणून चित्रपटाचा नायक अर्जुन (इमरान हाशमी) क्रिकेट बुकी दाखवला आहे. शिवाय हा हिरो बुकी असण्याबरोबरच मॅच फिक्सिंगचे 'सत्कार्य'ही पार पाडतो आहे. आणि चक्क नायिका त्याच्या प्रेमातही पडली आहे. फक्त तिचे म्हणणे एवढेच की त्याने हे बेकायदेशीर काम सोडून प्रामाणिकपणे पैसे कमवावे.
लहानपणी म्हणे हा अर्जुन वडिलांबरोबर जायचा तेव्हा ते त्याला खेळण्याची दुकाने असतील, तिथे नेत नव्हते. कारण काय तर त्यांच्याकडे पैसे नव्हते. मुलाने हट्ट केला तर तो पुरवता येणार नाही ही अगतिकता त्यामागे होती. त्याचे वडिल प्रामाणिक असतात आणि प्रामाणिकतेमुळे जास्त पैसे कमावता येत नाही. म्हणून ते मुलासाठी न परवडणार्या गोष्टी घेऊ शकत नसतात.
अर्जुनला मात्र भरपूर पैसा कमवायचा आहे. त्यासाठी त्याला कोणताही मार्ग चोखाळणे गैर वाटत नाही. तीन पत्ते खेळून पैसे कमावणार्या अर्जुनचे जोयावर (सोनल चौहान) प्रेम जडते. एकदा त्या जोहाला एक महागडी अंगठी आवडते, तर हे महाशय दुकानाची काच फोडून ती अंगठी मिळवतात आणि तिला देतात. कारमध्ये जाणे आवडते म्हणून तो क्रिकेट सामन्यावर पैसे लावून भरपूर पैसे कमावतो आणि त्या पैशातून कार घेतो.
एकीकडे या जोयाच्या सगळ्या आवडी अगदी उंची आहेत. आणि त्या पुरविणे म्हणजेच प्रेम करणे असे अर्जुनला वाटते. विशेष म्हणजे अर्जुन तिच्या सगळ्या आवडी पुरवत असताना त्याच्याकडे एवढा पैसे कसा काय येतो असा प्रश्नही तिला पडत नाही. आणि एका क्षणी अचानक अर्जुन क्रिकेट बुकी आहे, हे कळल्यावर तिला (म्हणे) धक्का बसतो. मग तिची जीभ अचानक प्रामाणिकतेची भाषा बोलायला लागते. बेकायदा धंदे बंद करून अर्जुनने कायदेशीर मार्गाने पैसे कमवावे असे ती सांगते. त्याचवेळी स्वतः जोया मात्र एका डान्सबारमध्ये देहप्रदर्शन करून 'डान्स गर्ल' म्हणून कुठले नैतिक कार्य करत असते, ते मात्र कळलेले नाही.
थोडक्यात लेखक विशेष भट्ट यांच्या मनातला गोंधळ कथेत उतरल्याने ते काही 'विशेष' कामगिरी करू शकलेले नाहीत. मॅच फिक्सिंग वगैरे सगळे वरवर दाखवले आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने मॅच फिक्सिंग होते, असे दाखविल्यावर लोकांनाही ते खरेच वाटेल. कुणाल देशमुखने ढिसाळ पटकथेला बर्यापैकी बांधण्याचा प्रयत्न केलाय. पण अनेक जागा 'शिवायच्या' राहिल्या आहेत. पण एकूण सादरीकरण ठीक आहे. विशेषतः क्लायमॅक्स चांगला आहे. 'चुंबनफेम' इमरान हाशमीचा एरवी अभिनयाशी कधी संबंधही आलेला नाही, ते यावेळीही त्याने दाखवून दिले आहे. कारण कोरा चेहरा ही त्याची ओळख कायम ठेवण्यात तो याही चित्रपटात यशस्वी ठरला आहे. नवी नायिका सोनल चौहान दिसते ठीक, पण अभिनयात सुमार आहे. बाकीचे कलावंत हजेरीपुरते येतात. चित्रपटाचे संगीत मात्र लोकप्रिय होते आहे. (इमरानचे चित्रपट धाडकन आपटत असले तरी त्याचे संगीत मात्र कसे काय बुवा गाजते ते त्यालाच ठाऊक)
'जन्नत' नाव वाचून स्वर्गसुखाचा अनुभव घेऊ असा विचार करत असाल तर अपेक्षाभंग होईल. अगदी नरकाचा नाही तरी स्वर्गाचाही अनुभव नक्कीच येणार नाही. इमरान हाशमीचे चाहते असलाच तर मात्र जरूर जा. आणि हो त्याच्या आधीच्या चित्रपटाच्या पूर्वानुभावरून जात असेल तर 'तसली दृश्ये' यात फारशी नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे एक तर तुम्ही त्याचे चाहते असाल तर तुम्हाला अगदी 'जन्नत'चा अनुभव येईल आणि चाहते नसाल तर मात्र 'जहन्नूम' मध्ये (नरक) गेल्यासारखे वाटले. आता विचार तुम्ही करा.
फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...
|