निर्माता- रमण मारू- केतन मारू- मानसी मारू दिग्दर्शक- प्रियदर्शन संगीत- विद्यासागर कलाकार- अक्षय खन्ना, परेश रावल, जेनेलिया डिसूझा, ओम पुरी, शोभना, अर्चना पुरणसिंह, मनोज जोशी, राजपाल यादव.
'मेरे बाप पहले आप'मध्ये एक संवाद आहे.‘सरकार ने शादी की न्यूनतम आयु निर्धारित की है, अधिकतम नहीं’ अर्थ सरळ आहे. वय कितीही वाढले तरी लग्न करण्यास सरकारची हरकत नाही. हीच थीम घेऊन प्रियदर्शनने 'मेरे बाप पहले आप' चा डोलारा रचला आहे. त्याला विनोदाची फोडणी दिली आहे.
पण पूर्ण चित्रपट विनोदी आहे, असेही नाही. त्यात गंभीर प्रसंगही आहे. पिकल्या वयातही हात पिवळे करण्याची संधी मिळाली पाहिजे, याची तरफदारी प्रियदर्शन या चित्रपटातून करतो. विशेष म्हणजे मुलगाच बापाचे हात पिवळे करण्याचे सत्कार्य पार पाडतो. हे सगळे पाहिल्यावर मेरे बाप हा डोक्याला नस्ता ताप वाटल्याशिवाय रहाणार नाही.
जनार्दन विश्वंभर राणे (परेश रावल) या अस्सल मराठी आडनावाचा गृहस्थ बायको गेल्यानंतर दोन मुले चिराग (मनोज जोशी) व गौरव (अक्षय खन्ना) यांना अगदी आईचे प्रेम देऊन वाढवतो. गौरव मोठा होऊन वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. गौरव व त्याच्या वडिलांचे संबंध एखाद्या मित्रासारखे आहेत. त्यामुळेच तो आपल्या वडिलांचे लाड करतो, तसेच रागावतोही.
मग एकदा गौरवची गाठ शिखाशी (जेनेलिया डिसूझा) पडते. ती अमेरिकेहून एक महिन्यासाठी भारतात आली आहे. शिखा तिची गार्डियन अनुराधाबरोबर (शोभना) रहाते. गौरव व शिखा यांच्यात चांगली दोस्ती होते. पुढे गौरवच्या वडिलांच्या आयुष्यात अनुराधा कधी तरी आलेली असते ही बाब त्यांना कळते. अखेर गौरव सगळ्या अडचणींवर मात करून आपल्या वडिलांचे लग्न अनुराधाशी लावून देतो.
प्रियदर्शन विनोदी चित्रपट बनविण्यात माहिर आहे. हेराफेरीपासून त्याने अनेक चांगले विनोदी चित्रपट दिले आहे. त्याला लोकांना काय हवे आहे, हे कळले आहे. एवढे विनोदी चित्रपट दिल्यानंतर विनोदाचा स्तर मात्र खाली खाली येतो आहे. 'मेरे बाप' हे त्याचे एक उदाहरण. चित्रपटाचा पहिला भाग विनोदी वाटावा असा आहे. दुसरा भाग मात्र अनाकलनीयरित्या गंभीर झाला आहे. पूर्वी कादरखान जसे संवाद लिहायचा त्या स्टाईलचे संवाद यातही ऐकायला मिळतात.
शिखा व गौरव यांच्यातील छेडछाड बराच काळ चालते. पण त्यात काही दम नाही. जनार्दन व शोभना यांची प्रेमकहाणी काही तितकी जमलेली नाही. क्लायमॅक्सला वजन येण्यासाठी नसरूद्दीन शहाला आणले आहे.
चित्रपटाची लांबी खूपच आहे. त्यामुळे अनेकदा चित्रपट रेंगाळल्यासारखा वाटतो. संगीत निराशाजनक आहे. एकही गाणे हिट होण्यासारखे नाही. साठीत लग्न करण्याचा मुद्दा लोकांना तितका भावेल असे वाटत नाही.
परेश रावलची मुख्य भूमिका आहे. त्यांनी अतिशय छान अभिनय केला आहे. अक्षय खन्नाही प्रभावी आहे. जेनेलिया डिसूझाचा चेहरा तजेलदार आहे. तिचा अभिनय चांगला आहे, पण उच्चार सदोष आहेत. ओमपुरीने लंपट व्यक्तीची भूमिका छान निभावली आहे. शोभना व राजपाल यादवला वाया घालवले आहे.
एकुणात चित्रपट सामान्य आहे. त्याची लांबी कमी करणे गरजेचे आहे. अन्यथा 'मेरे बाप' हा डोक्याला नुस्ता ताप आहे.
|