निर्माता : कुमार एस. तौरानी, रमेश एस. तौरानी दिग्दर्शक : अज़ीज़ मिर्जा संगीत : प्रीतम चक्रवर्ती कलाकार : शाहीद कपूर, विद्या बालन, जूही चावला, ओम पुरी
तरुणपणी प्रयत्नांपेक्षा नशिबावर विश्वास करणारी आणि म्हातारपणी नशिबावर अजिबात विश्वास नसलेल्या व्यक्ती इतका मूर्ख कुणीही नाही, असे अजीज मिर्जा यांच्या वडिलांनी त्यांना एकदा सांगितले होते. हीच एक थीम घेऊन अजीजची मुलगी राहिल मिर्जा हिने ‘किस्मत कनेक्शन’ ची कथा लिहिली आहे.
नशीब खरोखरच असते का हा न संपणारा विषय आहे. त्यावर गंभीर चर्चा रंगू शकते. अनेकदा एखाद्या गोष्टीत अपयशी ठरलेली व्यक्ती शेवटी नशिबाला दोष देऊन मोकळी होते. नशिबाला मात्र कोणत्याही शास्त्राचा आधार नाही. अजीजचा हा चित्रपटही असाच तर्क-अतर्काच्या पातळीतून आपल्याला नेतो. चित्रपटाचा नायक राज (शाहिद कपूर) खूप हुशार मुलगा. कॉलेजच्या आयुष्यात नेहमीच यश सोबत घेऊन चालणारा हा तरुण जेव्हा व्यावसायिक जगात सातत्याने अपयशाचा सामना करतो तेव्हा नाईलाजाने त्याला भविष्य सांगणा-या हसीना बानो जानची (जूही चावला) मदत घ्यावी लागते.
हसीना एक टॅरो कार्ड रिडर आहे. राजने त्याचा लकी चार्म शोधल्यास तो पुन्हा यशस्वी होऊ शकेल असा सल्ला ती त्याला देते. झाले, राजचा प्रवास सुरू होतो लकी चार्मच्या शोधात आणि त्याला त्याचे नशीब सापडते प्रियामध्ये (विद्या बालन).
नेहमीच्या फिल्मी स्टाईमध्ये सुरुवातीला भरपूर भांडणारे हिरो-हिरॉईन नंतर चांगले मित्र होतात आणि नंतर एकमेकांचे सर्व काही. प्रिया जेव्हा राजसोबत असते तो प्रत्येक ठिकाणी यशस्वी होतो. राजला त्याचा लकी चार्म असा मिळतो.
पुढे अनेक चित्रपटांमध्ये वापरून आता जुनाट झालेली कथा यात सोबतीला जोडली आहे. प्रिया वृद्धांचा सांभाळ करणारे एक कम्युनिटी सेंटर चालविते. या जागेवर बिल्डर संजीव गिल (ओम पुरी) एक शॉपिंग मॉल बनविण्याचा प्रयत्न करतो. या शॉपिंग मॉलचे डिझाईन योगायोगाने राज बनवतो. या एका प्रकरणामुळे राज आणि प्रियामध्ये गैरसमज निर्माण होतात. नंतर ते कसे दूर होतात हाच चित्रपटाचा खरा गाभा आहे. सोबतीला नेहमीप्रमाणे नायिकेचा पूर्वनियोजित वरही आहे.
चित्रपटाचे शूटिंग भारतात सहज करता आले असते. मात्र त्याला थोडा रिच लुक मिळावा यासाठी कॅनडामध्ये शूटिंग केले गेले. कथेत काहीही नाविन्य नाही. मात्र संजय छैल, विभा सिंह आणि साई कबीर यांची पटकथा चांगली असल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात ती यशस्वी होते. मध्यंतरानंतर चित्रपट अतशिय संथ गतीने पुढे सरकतो. अनेक गीते नुसतीच घुसडलेली वाटतात.
शाहिद कपूर चांगला कलाकार असल्याने त्याने आपले काम चोख बजावले आहे. अनेक दृश्यांमध्ये तो शाहरुखची नक्कल करीत असल्यासारखे वाटते. कदाचित ही अजीज मिर्जाची करामत असावी. कारण त्यांनी आजवरचे सर्वच चित्रपट शाहरुख सोबत बनविले आहेत.
विद्या बालन आपल्या लुकमुळे संपूर्ण चित्रपटात गोंधळलेली वाटली. तिने अनेक प्रकारच्या केशभूषा आणि वेषभूषा करून पाहिल्या. या सर्वांचा परिणाम तिच्या अभिनयावर झाला. शाहीद-विद्या जोडी पडद्यावर जमली नाही. जूही चावला ओव्हर एक्टिंग करते असे वाटते. ओम पुरी, विशाल मल्होत्रा, मनोज बोहरा आणि हिमानी शिवपुरी यांनी दिलेले काम चांगले केले. प्रीतमने दिलेली काही गीतेही श्रवणीय वाटतात.
‘किस्मत कनेक्शन’ म्हटलं तर तसा फील गुड सिनेमा आहे. दैव आणि नशीब या संकल्पनांना चालना देणाराच हा चित्रपट म्हणावा लागेल.
फोटोसाठी येथे क्लिक करा....
|