निर्माता : विकी राजानी दिग्दर्शक : जहाँगीर सुरती संगीत : गौरव दासगुप्ता, प्रीतम चक्रवर्ती कलाकार : बिपाशा बसु, नील नितिन मुकेश, राहुल देव, सोफी चौधरी
थ्रिलर चित्रपट बनविणे येरागबाळ्याचे काम नाही. लोकांना बांधून ठेवणारा चित्रपट असेल तरच थ्रिलर चित्रपट बनविणे सार्थकी लागते. 'आ देखे जरा' थ्रिलर असल्याचा दावा करण्यात आलाय खरा, पण त्यात एकही दृश्य उत्कंठा वाढविणारे नाही. सुरवातीपासून शेवटपर्यंत पडद्यावर काय चाललेय ते कळत नाही. जे चाललेय त्याची संगती लागत नाही. एवढं सगळं होत असताना डोकं जाम दुखायला लागतं आणि कधी एकदा बाहेर जातो असं होऊन जातं.
या चित्रपटाच्या कथेत चांगला चित्रपट बनविण्याची संधी होती. पण दिग्दर्शकाने ती वाया घालवली आहे. नायक रेच्या हातात (नील नितिन मुकेश) एक कॅमेरा लागतो. तो ज्याचा फोटो काढतो, त्याच्याबरोबरीने त्या व्यक्तीचे भविष्यही त्याला कळते. आज काढलेल्या लॉटरीच्या फोटोतून त्याला उद्याच्या लॉटरीचे क्रमांक दिसून येतात. मग घोडेस्वारी, शेअर्स व लॉटरी यांच्या माध्यमातून तो खूप पैसे कमावते. याच कॅमेर्याच्या माध्यमातून तो डिजे सीमीचा (बिपाशा बसू) जीव वाचवतो. ती त्याची गर्लफ्रेंड होते. इथपर्यंतची सगळी रामकहाणी अतिशय नीरसपणे पडद्यावर माडंली गेली आहे.
IFM
एक दिवस स्वतःचाच फोटो काढल्यानंतर रेला काळा हा मृ्त्यूनिदर्शक रंग दिसून येतो. पण त्याला कोण मारू इच्छित आहे, हे काही त्याला कळत नाही. इथून पुढे आपण खुर्ची सावरून बसतो. पण पुन्हा एकदा दिग्दर्शक सगळ्या प्रयत्नांवर पाणी ओततो. कथा पुढे कशी सरकवावी हेच लेखक व दिग्दर्शकाला कळलेले नाही. त्यामुळे अनेक बिनडोक प्रसंग येत-जात रहातात.
दिग्दर्सक सूरतींचे कामगिरी अगदीच सुमार आहे. नीलने जॉनी गद्दारमध्ये बर्यापैकी काम केले होते. पण या चित्रपटात तो निराश करतो. त्याची संवादफेकही सदोष आहे. बिपाशाला फारसा स्कोप नव्हताच. राहूल देव व इतर कलावंत वाट्याला आलेली कामे करतात. संगीतही साधारण आहे. चित्रपट दोन तासांचा आहे, एवढीच काय ती चांगली बाब म्हणता येईल. चित्रपटाच्या पटकथेत अनेक त्रुटी आहेत. चित्रपट करताना कोणत्या चुका करू नयेत हे समजावून सांगण्यासाठी त्यांचा नक्की उपयोग होईल.
एकुणात, 'आ देखे जरा' मध्ये पाहण्यासारखे काहीही नाही. त्याऐवजी आपलाच कॅमेरा घेऊन फोट काढायला गेलेले बरे.