बॅनर : सहारा वन मोशन पिक्चर्स, बीएसके फिल्म्स निर्माता : बोनी कपूर दिग्दर्शक : प्रभुदेवा संगीत : साजिद-वाजिद कलाकार : सलमान खान, आयशा टाकिया, महेश मांजरेकर, प्रकाश राज, विनोद खन्ना, गोविंद नामदेव, मनोज पाहवा, इन्दर कुमार, महक चहल, पाहुणे कलावंत - गोविंदा, अनिल कपूर, प्रभुदेवा
शाहरूख लोकांना का आवडतो? लव्हर बॉय म्हणून. आमीर का आवडतो? त्याचा 'बौद्धिक' अभिनय म्हणून. आणि सलमान का आवडतो? 'फूल एंटरटेनर' म्हणून. शाहरूख आणि आमीरचा जसा एक 'क्लास' आहे, तसाच सलमानचाही आहे. म्हणूनच त्याला दुर्लक्षिता येत नाही. म्हणूनच अनेकदा तो या दोघांपेक्षाही 'सरप्लस' ठरतो. आताही तीच परिस्थिती आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अपयश पाठी लागलेल्या सलमानला 'वॉंटेड' असलेले यश आता नक्की मिळणार याच्या दुदुंभी आता बॉक्स ऑफिसवर वाजू लागल्या आहेत. डझनाहून अधिक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर पडद्यावर झळकलेला सलमान खानचा ताजा 'वॉंटेड' हा चित्रपट मागचे अपयश धुऊन यशाची दणदणीत वसुली करून देणारा ठरणार असल्याचे संकेत आहेत.
सलमानचा स्वतःचा एक चाहता वर्ग आहे. जो नेमाने त्याचे चित्रपट पहातो. बॉलीवूडमध्ये सलमानचाही एक दर्जा आहे, भलेही त्याचे चित्रपट चालत का नसेनात, त्याला दुर्लक्षून कुणालाही चालणार नाही. आणि आता तर नाहीच नाही.
प्रभूदेवा दिग्दर्शित वॉंटेडमधून सलमान त्याच्या जुन्या देमार हिरोच्या रूपात पुन्हा एकदा पडद्यावर आलाय. हा चित्रपट म्हणजे टिपीकल बॉलीवूडी पदार्थ असून त्यात गाणी, नृत्य, हाणामारी, गॅंगवॉर, लव्ह स्टोरी असा सारा मसाला त्याच्या गरजेइतक्या चवीनुसार टाकलाय. त्यामुळे ही डिश चांगलीच खमंग बनलीय.
वॉंटेड ही राधे (सलमान खान) या शार्प शूटरची कथा आहे. तो गनी भाई (प्रकाश राज) या गुंडासाठी काम करतो. पण आपल्या अटीवर. रक्तरंजीत हाणामार्या नि गोळीबार या त्याच्या आवडीच्या गोष्टी आहेत. माणसं मारणे हा त्याचा धंदा आहे आणि अंडरवर्ल्डमध्ये त्याचं नाव मोठं आहे. गनीभाईच्या अनेक शत्रूंना तो ढगात पाठवतो.
IFM
IFM
तर हा राधे फक्त 'बॅड बॉय' नाही. त्याच्यातही ह्रदय नावाची काही चीज आहे. आणि ते ह्रदय जान्हवीसाठी (आयेशा टाकिया) धडकतं. पण कथेच इथेच 'ट्विस्ट' आहे. एक बुभुक्षित इन्स्पेक्टर तळपदे (महेश मांजरेकर) जान्हवीसाठी गळ टाकून बसलाय. आता एवढं सांगितल्यावर पुढची कथा काय असेल याचा अंदाज बॉलीवूडी चित्रपट पहाणारं लहान मूलही सांगेल.
कथा सरधोपट असली तरी तिचं सादरीकरण प्रभूदेवाने छान केलंय. त्याच्याच पोखिरी या दाक्षिणात्य चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचा संपूर्ण फोकस सलमान खान आहे. त्याला अशा रितीने पेश केलंय की कुठल्याही एंगलने तो आख्खा पडदा आणि प्रेक्षकांची मनेही व्यापतो. थोडक्यात वॉंटेड म्हणजे सलमानचा 'गझनी' आहे. सलमान हाच फोकस असल्याने बाकीची पात्रे ही नेमून दिलेल्या कामांसाठी आहेत, ती कामे ती यथायोग्य रितीने पार पाडतात.
बाकी या चित्रपटात 'फूल एंटरटेनमेंट' आहे. ठेकेबाज गाणी, दिलखेचक नृत्य, दणकेबाज डॉयलॉग, जोरदार हाणामारी, हळूवार प्रेम असं सगळी काही आहे. थोडक्यात वॉंटेड म्हणजे बॉलीवूडी मसाल्याची परफेक्ट डिश आहे. त्यामुळे ती चाखायला काहीच हरकत नाही.