निर्माता : रमेश एस. तौरानी दिग्दर्शक: राजकुमार संतोषी संगीत : प्रीतम कलाकार : रणबीर कपूर, कैटरीना कैफ, उपेन पटेल, दर्शन जरीवाला, असरानी, गोविंद नामदेव, स्मिता जयकर, जगदीप, जाकिर हुसैन, सलमान खान (विशेष भूमिका)
सनी देओलला बेंबीच्या देठापासून ओरडण्याची संधी देणार्या सिनेमांपासून ते अगदी हलक्या फुलक्या कॉमेडीपर्यंत, असा दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा प्रवास अष्टपैलू आहे. अंदाज अपना अपना नंतर संतोषी कॉमेडीकडे फारसे वळालेले नव्हते. पण आता 'अजब प्रेम की गजब कहानी'च्या निमित्ताने संतोषींनी एक प्रसन्न चित्रपट दिला आहे. हा रूढार्थाने विनोदी चित्रपट नाही, पण कहाणीच्या अनुषंगाने विनोदाचा शिडकावा वातावरण प्रसन्न ठेवतो. रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांची जबरदस्त केमिस्ट्री चित्रपटाची मजा वाढवते.
प्रेम (रणबीर कपूर) आणि जेनी (कतरीना कैफ) यांची ही प्रेमकथाच. पण वेगवेगळ्या वळणातून जात ती अखेरीस पोहोचते ते पहाणे म्हणजे एक छान प्रवास आहे. नवव्या इयत्तेतूनच शाळा सुटलेल्या प्रेमला हॅपी क्लबचे अध्यक्ष व्हायचे आहे. या क्लबच्या माध्यमातून लोकांच्या चेहर्यावर हसू फुलविण्याचे त्याचे प्रयत्न आहेत. क्लबमधले इतर सदस्य हे अत्यंत आळशी आणि त्यांच्या तोंडावर कायम बारा वाजलेले आहेत. प्रेमच्या या जगात अनाथ जेनीचा प्रवेश होतो. जेनीचे दत्तक पालक तिचे लग्न एका श्रीमंत बापाच्या मुलाशी ठरवतात.
IFM
IFM
एका क्षणी प्रेम आणि जेनी परस्परांना भेटतात आणि चांगले मित्र बनतात. जेनीची तिच्या राहूल नावाच्या नियोजित पतीसोबत गट्टी जमावी यासाठी प्रेम प्रयत्न करत असते. पण हे करत असताना त्याला जेनीविषयी काय वाटते हे लपविणेही अवघड जाते. त्यातून निरागसपणे विनोद घडतो. या सगळ्याला संवादाची उत्तम फोडणी मिळाली आहे. त्यात रणबीर आणि कतरीना यांनी अफलातून टायमिंग साधले आहे.
वेक अप सिदनंतर रणबीरचा छान अभिनय या चित्रपटातून पहायला मिळतो. पूर्ण चित्रपटभर त्याचाच प्रभाव आहे. तो दिसतो छान आणि प्रेमच्या भूमिकेला पूर्ण न्यायही देतो. त्याचवेळी जेनीच्या भूमिकेसाठी कतरीना ही योग्य निवड आहे.
बाकी दर्शन जरीवाला, स्मिता जयकर, नवनीत निशाण, गोविंद नामदेव आणि उपेन पटेल यांची उपस्थितीही प्रसन्न आहे. त्यातही दर्शन आणि स्मिता जयकर मजा आणतात. प्रीतमचे संगीतही तरूणांना नक्की आवडेल.
रणबीर आणि कतरीनाच्या छान केमिस्ट्रीसाठी चित्रपट नक्कीच पहायला हवा.