बॅनर : यूटीवी मोशन पिक्चर्स निर्माता : रॉनी स्क्रूवाला निर्देशक : केन घोष संगीत : अदनाम सामी कलाकार : शाहिद कपूर, जेनेलिया डिसूजा, मोहनीश बहल, परीक्षित साहनी यू सर्टिफिकेट * 7 रील * दोन तास एक मिनिट रेटिंग : 2.5/5
'चान्स पे डान्स' हा चित्रपट अंगावर शहारे आणणारा आहे, पण हे शहारे वेगळ्या अर्थाने आहेत. यातल्या एका प्रसंगात एक लहान मुलगा नाक शिंकरताना अगदी जवळून दाखवला आहे. फुर्रर करत तो नाक साफ करतो. दुसरा प्रसंग आहे एका पारशी गृहस्थाचा. हा कराकरा आपल्या छातीवर खाजवताना दिसतो आणि एका प्रसंगात दस्तुरखुद्द नायक शाहिद कपूरही आपल्या नखांनी फळ्यावर ओरखडा ओढताना दिसतो. हे तीनही प्रसंग पाहताना जे होतं, तोच परिणाम संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरही कायम रहातो. शहारे येण्याचा उल्लेख वर केला आहे तो या अर्थाने. थोडक्यात 'डान्स पे डान्स' हा पकवणारा चित्रपट आहे.
समीर बहल (शाहिद कपूर) संघर्षशील कलावंत आहे. दिल्लीहून तो मुंबईत त्यासाठीच आला आहे. सुरवातीला त्याला सगळीकडे नाकारले जाते. पण त्याच्या नृत्याच्या कौशल्याच्या जोरावर त्याला संधी मिळते. तेही चक्क नायकाच्या भूमिकेत. पण आयत्यावेळी त्याला गाळले जाते.
एकीकडे त्याची आर्थिक स्थितीही ढासळते आहे. त्याच्याकडे घरभाड्यालाही पैसे नाहीत. जेवणा-खाण्यासाठी पैसे नाहीत. अखेर त्याला नृत्यशिक्षकाची नोकरी करणे भाग पडते. मग या नृत्यशिक्षकाचा संघ एका आंतरशालेय स्पर्धेत भाग घेतो. तिथे सगळ्या विपरीत परिस्थितीत त्याचाच संघ जिंकतो आणि शेवटी समीर चित्रपटाचा स्टार बनतो.
कथा सुरू होते तेव्हा त्याचा शेवट काय होईल, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. आख्खा चित्रपट एका सरळ रेषेत जातो. कुठेही वळणे नाहीत किंवा खाचखळगेही नाहीत. प्रेक्षकाचा जीव गुंतेल असे काहीही नाही. बॉलीवूडमधील त्याचा संघर्षशील प्रवासात होणारी त्याची मानसिक कुचंबणा कुठेही दिसून येत नाही. त्यातल्या अनेक प्रसंगांचे तार्किक कारणही कळत नाही.
तिकडे या समीरचे उदयोन्मुख कोरीयोग्राफरशी (जेनेलिया डिसूझा) धागे जुळल्याचे दाखवले आहे. पण त्यामुळे मुळ कथेवर काहीच परिणाम होत नाही. कथेच्या जोडीने ही प्रेमकथाही सुरू रहाते जणू त्या गाडीचा सांधाच कुठला वेगळा आहे. संघर्षशील नायकाचा बॉलीवूडमधील यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवास या अवघ्या एका वाक्याच्या कथेचे आख्ख्या चित्रपटात रूपांतर करताना कथाकार, पटकथाकर यांना काही सुचल्याचे दिसतच नाही. सहाजिकच दिग्दर्शकापुढेही नेमके काय चित्रित करायचे हेही कळलेले नाही. त्यामुळे कथाकार, पटकथाकाराच्या सुमार कामगिरीत दिग्दर्शक केन घोष यांनी भर टाकण्याव्यतिरिक्त काहीही केले नाही.
शाहिद कपूरची नृत्ये हीच काय ती चित्रपटातील उल्लेखनीय बाब आहे. बाकी ज्या गाण्यांवर नाचतो त्याचे अदनान सामीने दिलेले संगीतही सुमार आहे. जेनेलिया डिसूझाला फारशी संधी मिळालेली नाही. तरीही ती चमकते, पण त्यातून तिची क्षमता नीट कळत नाही. शाहिद कपूरच्या जोरावर हा चित्रपट पुढे सरकतो. पण 'एट पॅक्स एब्ज' करूनही आख्खा चित्रपट तोलण्याची क्षमता त्याच्यात नाही.
थोडक्यात दिग्दर्शक केन घोष यांचा 'चान्स पे डान्स' हा एक शुद्ध कंटाळवाणा चित्रपट आहे. त्याच्या वाट्याला न गेलेलेच उत्तम.