अरबाज आणि सोहेल यांना सलमानएवढे यश काही मिळाले नाही. अरबाजला बर्याच चित्रपटात काम करूनही नायकाच्या भूमिकेत स्थिर झाला नाही. त्यामुळे त्याला दुय्यम भूमिकाच साकाराव्या लागल्या. मात्र स्वत:ची मर्यादा जाणणार्या अरबाजने याबद्दल कुठलीही तक्रार केली नाही.
असे असले तरी या तिघा भावांत खूप प्रेम आहे. नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार सलमान सतत अरबाज, सोहेल यांच्या करियरबद्दल विचारमग्न असतो. अरबाजने नव्याने नायक म्हणून करियरची सुरुवात करावी अशी त्याची इच्छा आहे.
त्यासाठी तो बोनी कपूरची मदत घेत आहे. बोनीच्या एका चित्रपटात सलमान काम करीत असून अरबाजला हिरोच्या भूमिकेत घेऊन एखादा चित्रपट करण्याची विनंती बोनीला केली आहे.
अरबाजला हिरोच्या भूमिकेत घेऊन चित्रपट निर्माण करणे सोपी गोष्ट नाही हे जाणणारा सलमान त्यासाठी स्वत:चे मानधनही कमी करावयास तयार आहे. चित्रपटाचा सहनिर्माता बनणेही त्याला मंजूर आहे. बोनीने हा प्रस्ताव स्वीकारला असून त्यासाठी तो पटकथेच्या शोधात आहे. पटकथा निवडल्यानंतर दिग्दर्शक आणि अन्य कलाकारांची निवड केली जाणार आहे.
|