बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणार्या प्रत्येक नायिकेचे एक स्वप्न असते. पहिला चित्रपट यशराज फिल्म्सचा करावा. त्याचा दिग्दर्शक आदित्य चोप्रा असावा आणि नायक अर्थातच शाहरूख असावा.
अर्थात हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता फार कमी असते. पण काहींचे नशीब एवढे बलवत्तर असते की त्यांच्या बाबतीत ते मनात जे कल्पतात ते होते. अनुष्का शर्मा त्यातलीच एक. यश चोप्रा यांनी त्यांच्या आगामी 'रब ने बना दी जोडी' या आपल्या आगामी चित्रपटाची नायिका म्हणून अनुष्काचे नाव जाहीर केले आणि तिचा मत्सर करणार्यांच्या संख्येत वाढ झाली म्हणे.
पदार्पणातच यशराज फिल्म्सबरोबर काम करणार्या अनुष्काला आदित्य चोप्रा दिग्दर्शित करणार असून शाहरूख खान तिचा नायक असेल. या चित्रपटासाठी आदित्य बराच काळ नायिकेच्या शोधात होता. खूप शोध घेतल्यानंतर अखेर अनुष्काची गाठ पडली आणि अखेर त्याचा शोध संपला.
अनुष्का मॉडेल असून अभिनयाचा तिचा काहीही संबंध नाही. यश चोप्रा म्हणतात, आम्हाला पंजाबच्या एखाद्या छोट्या शहरातली वाटेल अशी मुलगा हवी होती. अनुष्का तशी वाटते. शाहरूखबरोबर ती शोभून दिसेल असा आम्हाला विश्वास आहे.
या चित्रपटाच्या शूटींगला १६ मेपासून सुरवात होणार असून १२ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे. दीपिका पदुकोणनेही पदार्पणात शाहरूखबरोबर काम केले होते. त्याचा फायदा एवढा झाला की ती आता एका चित्रपटाच्या आधारे बॉलीवूडमधील टॉप नायिकांच्या रांगेत जाऊन बसली आहे. अनुष्कालाही ती संधी आहे.
|