मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात दादा कोंडके यांचे स्थान अजरामर आहे. दादा म्हणजे वन मॅन इंडस्ट्री होते. तब्बल तीन दशके चित्रसृष्टीवर दादा नावाचे गारूड होते. बिनधास्त अभिनय, हजरजबाबीपणा, व द्वैअर्थी विनोद यांच्या बळावर दादांनी आपले सर्व चित्रपट हिट केले. आजही रिपीट रनला हे चित्रपट तुफान गर्दी खेचतात.
दादा गेले आणि मराठीत फार मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांची कमतरता सर्वांनाच जाणवू लागली. दादांची जागा कोण भरून काढणार? हा मोठा गहन प्रश्न आहे. पण निर्माते पियुष शहा यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्यापरीने सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या ‘आपला हात जगन्नाथ' यात एक नवा उमदा तंतोतंत दादा आपल्याला पहायला मिळणार आहे.
प्रमोद नलावडे प्रतिदादा म्हणून रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सिध्द झाले आहेत. ‘आपला हात जगन्नाथ' हा पूर्णपणे दादास्टाईल चित्रपट आहे. दादांच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये यातही आहेत. प्रमोद नलावडे यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं तंतोतंत दादासारखं दिसणं, बोलणं आणि वागणं. दादांची लकबही त्यांनी सही सही उचलल्याने नलावडे प्रतिदादा म्हणून शोभतात.
अभिषेक एन्टरप्राइझेस या बॅनरखाली निर्माता पियुष शहा आणि दिग्दर्शक योगेंद्र कोनकर यांनी हा चित्रपट नव्या दादांना घेऊन पडद्यावर आणला आहे. ‘आपला हात जगन्नाथ' या शीर्षकही दुहेरी अर्थाचे आहे. आपल्या कामासाठी आपल्या हाताचाच आधार घ्यावा लागतो या आशयावर हा चित्रपट आधारीत आहे. यातला नायक आनंद आणि त्याची पत्नी पुजा यांच्याकडे पोपट (प्रमोद नलावडे) हा नोकर कामाला आहे. तो स्वभावाने वेंधळा, धांदरट व खूप बडबडया आहे. जगाची उठाठेव करणे व त्यावर आपलं भाष्य करून हास्याचे फवारे उडवणे हे त्याचं काम. त्याची शकुंतला या तमासगिरीणीबरोबर सलगी आहे. तो तिच्या प्रेमात आहे व दिवसाढवळया त्याला तिची स्वप्ने पडतात.
या दादाची एक वाईट सवय आहे. मुलींचा विषय निघाला की त्याचा उजवा हात विचित्रपणे हलतो व त्यातून एक विनोद निर्माण होतो. दादा आनंदसमोर शकुंतलाचे खुप कौतुक करतो. त्यामुळे आनंदही चांगलाच ‘चार्ज’ होतो. त्याचवेळी पुजाची मैत्रीण निशा त्यांच्याकडे दोन दिवस रहायला येते. यातूनच ही कथा एक वेगळं वळण घेते. आनंदचा मित्र धर्मेश (अंडरवर्ल्डचा माणूस) त्याच्याकडे रहायला येतो. तो आपल्या एका मैत्रिणीच्या सहाय्याने आनंदला गोत्यात आणतो. पुढे तिचा खून होतो व आनंदवर खुनाचा आरोप येतो. त्यातून तो कसा सुटतो? त्यासाठी त्याला काय करावे लागते? त्याला कोणकोणत्या संकटाचा सामना करावा लागतो? हा सर्व कथाभाग विनोदी प्रसंगातून आपणास यात पहायला मिळेल.
चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यातील पोपट अर्थात प्रतिदादा प्रमोद नलावडे आहे. सव्वा दोन तास मनमुराद निखळ करमणूक, द्विअर्थी संवादाची रेलचेल व विनोदी ढंगातली दादा स्टाईल गाणी या सर्वांमुळे हा चित्रपट दादांची नक्की आठवण करून देईल. यात सुचित जाधव, प्राजक्ता गिरी, प्रज्ञा जाधव, अनिकेत, जुही, तृप्ती भोईर यांच्या धमाल भूमिका आहेत. याची गीतरचना व संगीत अशोक पवार यांचे असून लेखन दिल कुमार यांचे आहे. नृत्य अनिल सुतार, कला अभिमन्यू पवार, छायाचित्रण सुरेश उत्तेकर यांचे आहे. हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे
|