स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली तरी स्वतःची परंपरा सांगणारी अनेक घराणी असतात. सरदार येसाजीराव यांनी अडिचशे वर्षांपूर्वी एका लढाईत एक ढाल जिंकतात. त्या ढालीचा त्यांना अभिमान असतोच, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनेक पिढ्यांनाही तो अभिमान असतो. सयाजीराव हे येसाजीरावांचे परंपरा सांगणारे स्वातंत्र्योत्तर काळातील वंशज. ढाल त्यांनी प्राणापलीकडे जपलेली असते. ही महत्वाची ढाल भावनिक पातळीवर मोलाची असतेच पण आर्थिक पातळीवरही.स्वातंत्र्यानंतर ही ढाल सरकारजमा झालेली असते. पण सयाजीराव ती स्वतःच्या ताब्यात आणण्याचे ठरवतात. या बातमीची कुणकुण गुरू या धंदेवाईक चोराला लागते आणि सयाजीरावांच्या सहकार्यांना फितवून ती ढाल ताब्यात घेण्याचे तो ठरवतो. ढाल सयाजीरावांकडे घेऊन जाणा-या गाडीला तो लुटतो, एक वगळता उरलेल्या फितुरांना मारतो आणि ढाल घेऊन गोव्याला जातो. वाचलेला फितूर बबन त्याच्या मागावर राहून तोही गोव्याला येऊन पोचतो. हा फितूर बाबी, विकी, नेहा, प्रीती या भुरट्या चोरांना हाताशी धरून ढाल ताब्यात घेण्याचे कारस्थान रचतो. सयाजीरावही ढालीच्या शोधात निघालेले असतात. सयाजीराव, गुरू, स्मगलर टोनी, फितूर बबन, चौघे चोर आणि सिंकदर हा वस्तूविक्या यांच्यात ढालीसाठी मारामा-या सुरू राहतात...अखेर सयाजीरावांना ढाल परत मिळते.बबनच्या भूमिकेत लोकेश गुप्ते, गुरूच्या भूमिकेत सुबोध भावे भाव खाऊन जातात. मधुरा वेलणकर-आदिती शारंगधर-अंकुश चौधरी-भरत जाधव यांनी चोरांच्या भमिका चोख वठविल्या आहेत. मकरंद अनासपुरेने गंभीर करारी सयाजीरावांच्या भूमिकेत प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. निर्मल पांडेने हातखंडा स्मगलर टोनी रंगविला आहे. सिध्दार्थ जाधव याने सिकंदर इमाने इतबारे केला आहे. मारामारीचा विभाग सुबोध-लोकेशने सांभाळला आहे, पापभिरू तारांबळ भरत-अंकुशने पेलली आहे, हास्याचे फटाके सिध्दार्थने फोडले आहेत. मराठी चित्रपटात हिंदी गाणी खटकण्यासारखी आहेत. महेश मांजरेकरची पाहुणी भूमिका पाहुणीच काय पण अंगणातील सुध्दा वाटत नाही. त्याने घराबाहेरच थांबायला हवे होते. इंग्लिश चित्रपटातील टोळीयुध्द मराठी बाजाने रंगविण्यात दिग्दर्शक आदित्य सरपोतदार बर्यापैकी यशस्वी झालेला आहे. मॅकेनाज गोल्ड, पॉर अ फ्यू डालर्स मोअर या चित्रपटांची आठवण हा चित्रपट पाहताना हटकून येते. नेहमीच इंग्लिश चित्रपट पाहणार्यांसाठी हा मराठी चित्रपट चुकवू नये असा आहे. गोव्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, देखण्या नायिका, पाठलाग, गोळीबार हे ज्यांना आवडते त्यांच्यासाठी अगदी मेजवानी नसली तरी चांगला नाष्टा नक्कीच आहे. |