मुख्य पृष्ठ > मनोरंजन > नाट्य-चित्र > नाट्य-चित्र-समीक्षा > ह्दयस्पर्शी... 'सत्य'
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ह्दयस्पर्शी... 'सत्य'
- केदार पाटणकर

natya chitra
PR
शारीरिक अपंगत्व आलेल्या मुलाकडे बघण्याचा समाजाचा दयार्द्र दृष्टिकोन आणि त्या दृष्टिकोनाला ही मुले चोख उत्तर देऊ शकतात, हे दाखविण्याचा प्रभावी प्रयत्न 'सत्य' या चित्रपटात झालेला आहे.

सिध्दांत हा दिवाकर देशपांडे यांचा महाविद्यालयीन शिक्षण संपवून व्यवसायात पदार्पण करू पाहणारा मुलगा. दिवाकर यांनी त्याला पुढील शिक्षण देऊन स्वतःच्या व्यवसायात उतरविण्याचे ठरविले असते. सिध्दांतलाही ती वाट मंजूर असते. शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन, मित्रमैत्रिणींबरोबर मजा करून पुण्याला वडिलांकडे येत असताना त्याच्या गाडीला अपघात होतो आणि त्यात त्याला अपंगत्व येते. मेंदूला मार लागून त्याची बोलण्याची शक्ती जाते. पायातही व्यंग येते. दिवाकरांची सगळी स्वप्ने कोसळून पडतात. सावत्र आईला त्याचा त्रास होतो. दिवाकरांच्या व्यवसायावर परिणाम होतो. स्वतःकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन ओळखून सिध्दांत घरात हिंसक बनू लागतो. अखेरीस, त्याला 'कामायनी' या मतिमंद मुलांच्या आश्रमात ठेवण्याचे ठरविले जाते..

घरची ओढ वाटल्यामुळे तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण तेथील संचालक त्याची समजूत घालतात. नुसती समजूतच घालत नाहीत तर त्याच्यात आत्मविश्वास जागृत करतात. याच आत्मविश्वासामुळे सिध्दांत व त्याचे कामायनीतील मित्र संस्थेला एका संकटातून बाहेर काढतात. या कामात त्याची मैत्रीण संजना त्याला मदत करते. आनंदी होत चाललेला सिध्दांत आश्रमातीलच एका किरकोळ अपघातात सर्वांना सोडून जातो.

दिवाकर व सिध्दांतच्या सावत्र आईला हे कळते पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्याच्या स्मरणार्थ दिवाकर मतिमंदांसाठी एक आश्रम उभा करायचे ठरवितात. प्रा. सुहास जोग यांच्या मुलाने, पुष्करने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्याचा हा पहिलाच प्रयत्न नेटका आहे. सिध्दांतच्या भूमिकेलाही त्याने न्याय दिलेला आहे. तो नवोदित आहे, असे वाटत नाही. यापूर्वी पुष्कर जबरदस्त या चित्रपटात नायक म्हणून चमकला होता.

दिवाकर देशपांडे हा व्यावसायिक रवींद्र मंकणी यांनी दमदारपणे उभा केलेला आहे. हळवा बाप व कणखर व्यावसायिक यातील द्वंद्व त्यांनी नेमके उभे केले आहे. सावत्र आई मेघनाचा तिरस्कार आणि पण सिध्दांतसाठी असलेली मनाच्या एका कोप-यातली माया रेशम टिपणीस यांनी चांगली दाखविली आहे. मेघनाच्या वडिलांची पूरक भूमिका मोहन जोशी यांनी सहज साकारली आहे. सिध्दांतसाठी जीव टाकणारी मैत्रीण संजना स्मिता गोंदकरने चांगल्या रीतीने साकारली आहे. पोक्त पण खंबीर आश्रमचालक महाजन श्रीकांत मोघे या बुजुर्ग अभिनेत्याने प्रेक्षणीय केलेला आहे. सिध्दांत व महाजन यांच्यातील दृष्य तर केवळ पाहण्यासारखे. एखाद्या आजोबांनी नातवाला समजुतीच्या चार गोष्टी सांगाव्यात तसे ते दृष्य आहे.

कथा पुष्करचीच आहे. केवळ एकच असलेल्या नृत्याचे दिग्दर्शनही पुष्करने केले आहे. रवींद्र साठे यांच्या आवाजातील गीत छान आहे. एक बाब खटकण्यासारखी. अपघातात केवळ सिध्दांतलाच इजा होते, असे दाखविलेले आहे. त्याच्याबरोबर गाडीतच असलेल्या मित्रांना काही झाले आहे, असे कोठेही दिसत नाही. हे मित्र थेट शेवटच्या दृष्यातच दिसतात तेही धडधाकट.

एकुणात, चित्रपटाची हाताळणी भाबडी आहे पण चित्रपट आवडण्यासारखा आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
ढालीसाठीची 'उलाढाल'
'सॉरी भाई' रूचणार नाही
'कशाला उद्याची बात'चे रिमिक्स
गलगले निघाले- चार आण्याची कोंबडी...
गोची प्रेमाची आणि सामान्याचीही...
सनई-चौघडे: एका निराळ्या लग्नाची गोष्ट...