संत तुकाराम महाराज आपल्याला कधी समजलेच नाहीत. खरं तर झेपलेच नाहीत हे म्हणणं जास्त योग्य ठरेल. म्हणूनच देवळातल्या विठ्ठलाच्या दगडी मूर्तीशी आपण तुकारामांची भक्ती बांधली आणि त्यांची पालखी काढायला, जमलंच तर आपल्याला 'सोसतील' असे त्यांचे अभंग म्हणायला मोकळे झालो. संतांच्या मांदियाळीत बसवून आपणही 'तुका झालासे कळस' असे उच्चरवात ओरडतो, पण देवाच्या देवळात जाऊन त्याचे दगडी देवत्व नाकारणार्या, स्वतःच्या देहाचे मंदिर उभी करण्याची भाषा बोलणारा, देवाच्या नावाने दुकान मांडणार्यांविरोधात उघड बंडखोरी करणारा आणि त्याच देवाच्या नावातून निघणार्या अंधश्रद्ध परंपरांचे साप आपल्या अणुकुचीदार अभंगांनी ठेचणारा 'बंडखोर तुकाराम' आपल्याला कधी दिसतच नाही. झेपतही नाही. नेमका हाच तुकाराम लोकांसमोर आणण्याचा स्तुत्य प्रयत्न रंगकर्मी योगेश सोमण यांनी आपल्या 'आनंदडोह' या दीर्घांकाद्वारे केला आहे. तुकारामांभोवतीचे 'साजिरे-गोजिरे' भक्तीमय रूप लोकांना ठावूक असले तरी हा बंडखोरी करणारा तुकाराम स्वतःच्या वैचारिक घुसळणीत प्रेक्षकांनाही सामील करून घेतो. 'आनंदडोह' हे काही तुकारामांचे चरित्र नाही, किंवा त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर आधारीत सुसंगत कथानकही नाही. याला कथा आहे, पण तुकारामाला स्वतःची वैचारिक परंपरा मांडण्यास सहाय्यभूत ठरेल इतकीच. 'तुकाराम' मांडण्यासाठी ती हातात घेतलेली दोरी आहे. या दोरीला संदर्भ आहे, तो इंद्रायणीत बुडवलेल्या तुकारामांच्या गाथेचा. ही गाथा तेरा दिवस इंद्रायणीत बुडालेली आहे आणि या तेरा दिवसाच्या काळातलं, तुकारामांचं हे आत्मविश्लेषण आहे. सिंहावलोकनाच्या मार्गाने जाणारं हे आत्मविश्लेषण दस्तुरखुद्द तुकाराम तर करतातच, पण त्यांचेच स्त्रीरूप असणारी त्यांची पत्नी आवडीही करते. हा संपूर्ण दीर्घांक म्हणजे त्यांची वैचारिक घुसळणीचा परिपाक आहे. यात आपल्या विठ्ठल भक्तीची चिकित्सा तर तुकाराम करतातच, पण आपल्याला अभिप्रेत विठ्ठल म्हणजे काय हेही ते सांगतात. भक्तीच्या नावाखाली पाळल्या जाणार्या परंपरा आणि त्या परंपरा घालून देणारे त्यांचे पाईक यांचा येथेच्छ शब्दांत समाचारही ते घेतात. भक्तीची व्याख्या नीट समजावून सांगताना विठ्ठलाचे निराकार, निरावयव रूप आपल्या प्रत्येकात, निसर्गात आहे, याची जाणीवही ते करून देतात. ('सत्य हाच ईश्वर' या महात्मा गांधींच्या विधानाचा संदर्भ कदाचित तुकारामांच्या या भूमिकेतूनच घेतला गेला असावा काय?) तुकाराम हे व्यक्तिमत्व पावणेदोन तासांच्या दीर्घांकात मावणारे नाही, पण सोमण यांनी त्याच्या नेमक्या त्यांच्या भूमिकेवरच भर देऊन आणि ती तशीच मांडून संहितेत बंदिस्त केली आहे. शिवाय ती तितक्याच प्रत्ययकारी पद्धतीने सादरही केली आहे. ही संहिता म्हणजे तुकारामांच्या अभंगांच्या दरम्यान भरून काढलेले 'गद्य' नाही, तर तिलाही एक स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणूनच अभंगाच्याच जोडीने त्याच्या संवादालाही टाळ्या पडतात ते त्यातल्या सकसपणामुळेच. तुकारामाची मनोभूमिका अधिक स्पष्ट करणारे हे संवाद आहेत. श्री. सोमण यांनी तुकाराम आणि आवडी अशी दोघांची पात्ररचना करून दोन्ही पात्रे आपणच मांडली आहेत. पण त्यांच्या मते आवडी ही तुकारामांचेच स्त्रीरूप आहे. तुकारामांविषयीच्या अनेक गोष्टी ती आपल्या भाबड्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे अनेकदा क्लिष्ट नि वैचारिक होऊ पाहणारे नाटक ती सावरून धरते. तुकारामांच्या अध्यात्मिक भूमिकेचे पदर उलगडत असताना आवडीचे संवाद अर्थातच, जास्त 'मानवी' वाटतात. नि ते लोकांना भिडतातही. अभिनयाच्या बाबतीत श्री. सोमण यांनी दोन्ही भूमिका देहातून प्रकट झाल्यासारख्या वाटतात. त्यांचा तुकाराम खिळवून ठेवतो. अभिनयापेक्षा काही तरी वेगळे पहात असल्याचा भासही अनेकदा होतो. विशेषतः डोळे, हातांची हालचाल फारच प्रभावी ठरतात. संवादाची पकडून ठेवलेली पट्टीही तुकारामांचे सौम्य, मृदू व्यक्तिमत्व दर्शवणारी आहे आणि सामाजिक फटकार लगावताना हीच पट्टी वरही जाते. तुकारामांचे आवडीत रूपांतर झाल्यानंतरचे 'भूमिकांतर'ही फार छान जमले आहे. प्रकाशयोजना आणि नेपथ्यही नेटके आहे. विशेषतः टांगलेल्या घंटेच्या टणत्कारातून खाली इंद्रायणीत सोडलेली गाथा कायम डोळ्यासमोर ठेवण्याची दिग्दर्शकीय कल्पकताही कौतुकास्पद आहे. ' तुकाराम' यापूर्वी अनेकांनी अनेक पद्धतीने मांडला आहे. नाटका-चित्रपटातूनही तो समोर आला आहे. बंधू 'कान्होबांच्या तोंडून तुकाराम मांडण्याचा प्रयत्नही 'आनंदओवरी'तून किशोर कदम यांनी केला होता. त्यानंतर तुकाराम मांडण्याचा सोमण यांचा हा प्रयत्नही चांगलाच जमला आहे. पाहणार्यांचीही वैचारिक घुसळण करणारा हा 'आनंदडोहा' आहे. यात डुंबल्याशिवाय राहू नका, हेच काय ते सांगणं. |