नाट्य-चित्र गप्पा | आगामी नाट्य-चित्र | नाट्य-चित्र-समीक्षा | ओळख कलावंताची
मुख्य पृष्ठ मनोरंजन  नाट्य-चित्र  नाट्य-चित्र गप्पा > 'मास्तर एके मास्तर'ला सेन्सॉरने नाकारले
नाट्य-चित्र गप्पा
केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने 'मास्तर एके मास्तर' या संजय सूरकर दिग्दर्शित चित्रपटाला सर्टफिकेट देण्याचे नाकारले आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात आजपर्यंत कोणताही चित्रपट संपूर्णतः सेन्सॉर बोर्डाने नाकारला असे कधी घडले नव्हते. या चित्रपटाच्या निमित्ताने हे प्रथमच घडले आहे.

हा चित्रपट शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार दर्शविणारा असून तो विनोदी पद्धतीने दाखविण्यात आला आहे. अशोक सराफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट भ्रष्टाचाराचे आणि लांडीलबाडीचे उदात्तीकरण करतो असा बोर्डाचा आक्षेप आहे. सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी या चित्रपटातील अनेक प्रसंग आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. यात वर्गात दारू पुरविणे, महिलांची अवनती, दोन बायका असलेला शिक्षक या बाबींवर आक्षेप नोंदविण्यात आला आहे.

हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या नितिनियमांना धरून नाही. कितीही ठिकाणी कापला तरी त्यामुळे चित्रपटाची मूळ संकल्पना बदलता येणार नाही. त्यामुळे तो प्रौढांनाही पाहता येणार नाही. म्हणूनच त्याला प्रदर्शित होण्यास परवानगी न देण्याचा निर्णय एकत्रितपणे घेतल्याचे बोर्डाने कळविले आहे.

दरम्यान, सूरकारांनी या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मी चित्रपट बनवतो आहे. त्यामुळे माझी जबाबदारी मला माहिती आहे. त्या जोरावरच मला राज्य सरकारचे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. असे असताना आम्ही चुकीच्या संकल्पनेवर चित्रपट केला, असे बोर्ड कसे काय म्हणू शकते, असा सवाल त्यांनी केला. आता या निर्णयाविरोधात पुढे जाण्याचा निर्धार सूरकरांनी केला आहे.