शिक्षण क्षेत्रात कामगिरी बजावणार्या मेघे समूहाने आता मराठी चित्रपट सृष्टीत आपले पाय रोवण्याचे ठरविले आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मेघे एंटरटेनमेंटने 'इरादा पक्का' या आपल्या पहिल्याच चित्रपटाचा मुहूर्त शनिवारी वानाडोंगरी येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे साधला. यावेळी प्रख्यात मराठी दिग्दर्शक केदार शिंदे, कलाकार सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, सोनाली कुळकर्णी, जयवंत वाडकर उपस्थित होते.
नागपूर आणि आसपासच्या परिसरात तसेच विदर्भातील निसर्गरम्य ठिकाणी चित्रपट निर्मिती करण्याचा आणि स्थानिक कलावतांनाच प्राधान्य देण्याचा मेघे एंटरटेनमेंटचा पक्का इरादा झालेला आहे. निर्माते केदार शिंदे हे 'इरादा पक्का' चे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिका सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुळकर्णी यांची राहणार आहे.
कुटुंब व्यवस्थेवर या चित्रपटाचे कथानक आधारित असून, यात नवरा-बायको यांच्या दैनंदिन जीवनातील प्रसंगाचे यथार्थ चित्रण सादर करण्यात येणार आहे. काही झाले तरी मेघे एंटरटेनमेंटच्या माध्यमातून वैदर्भिय कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे एवढे मात्र खरे.