'नटरंग' ही केवळ तमाशा कलावंतांची कथा आणि व्यथा नसून कलेच्या क्षेत्रात तन मन आणि धन ओतून वावरणार्या प्रत्येक मनस्वी कलाकाराचे ते आयुष्य आहे. या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत हे कलेच्या या आंतरिक उर्मी आणि तळमळीतूनच आलेले असल्याने ते प्रेक्षकांना भावते आहे, भिडते आहे. या चित्रपटाला रसिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता 'नटरंग'साठी नवोदित दिग्दर्शक रवी जाधवबरोबरच संपूर्ण टीमने घेतलेले प्रामाणिक प्रयत्न फळास आल्याचे समाधान निश्चित वाटते, अशी मनमोकळी प्रतिक्रिया 'नटरंग'ची प्रमुख भूमिका करणार्या अष्टपैलू अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी नोंदवली.
डॉ. आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित झी टॉकीजची पहिलीच निर्मिती असणार्या 'नटरंग' या चित्रपटाने मामि चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवला. मुंबईत सध्या सुरु असलेल्या 99 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'नटरंग'चा जागतिक प्रिमियर झाला. त्यावेळी ते बोलत होते.
कथा, अभिनय, दिग्दर्शन आणि तंत्र या निकषांवर लक्षणीय चित्रपटांच्या 'अबॉव्ह द कट' या विभागात दाखवण्यात आलेल्या एकूण 94 आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये झी टॉकीज निर्मित 'नटरंग' हा एकमेव भारतीय चित्रपट म्हणून समाविष्ट करण्यात आला होता. 'मामि'कडून या विशेष विभागात 'नटरंग'ला मिळालेले स्थान आणि जागतिक पातळीवरील सर्वोत्तम चित्रपट पाहणार्या सुजाण रसिकांकडून मिळणारा हा प्रतिसाद ही या चित्रपटाच्या यशाची नांदी असल्याचे अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
मराठीत वेगळ्या विषयांवर चित्रपट बनत आहेत परंतु म्हणून मराठी चित्रपट सृष्टीला सुगीचे दिवस आले असे मानण्याची गरज नाही. असे चित्रपट मराठीत सात्याने येऊन या इंडस्ट्रीतील पैसा इथेच योग्य रितीने खेळता राहिला तर मराठी चित्रपट नीट तग धरेल. अर्थात त्या दिशेने आता मराठीची वाटचाल सुरु झालीय, असेही कुलकर्णी यांनी यावेळी नमूद केले.