पडद्यावर आपल्या खलनायकी अभिनयाने अनेकांना कापरं भरायला लावणा-या निळू फुलेंमध्ये सामाजिक जाणीवेचे भान ठेवून काम करणारा कार्यकर्ताही होता. पुरोगामी विचारांच्या चळवळीमधील हा कार्यकर्ता उलगडून सांगताहेत अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर...
तो काळ 1985 ते 90 चा असेल प्रकृती अस्वाथ्यामुळे निळू भाऊंनी चित्रपट कमी करून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र शांत बसेल तो कार्यकर्ता कसचा. याकाळात अंधश्रध्दा निर्मुलन समिती आणि समविचारी संघटनांच्या कामाची गतीही चांगलीच वाढली होती. आम्ही सांगत असलेले, मांडत असलेले विचार लोकांना पटू लागले होते. त्यामुळे कामही विस्तारत चालले होते.
याकाळात एक दिवस कुठल्याशा कार्यक्रमानिमित्त आम्ही निळू भाऊंकडे गेलो. निळू भाऊंनी स्वतःहून आम्हाला अंनिसच्या कामात मदत करण्याचे आश्वासन देऊन आठवड्याला दोन दिवस देण्याचा मनोदय बोलून दाखविला. मूळातच राष्ट्रसेवा दलाचे संस्कार आणि पुरोगामी विचारांची बैठक यामुळे निळू भाऊ आधीपासूनच चळवळीच्या संपर्कात होते. मात्र कामाच्या गडबडीत ते प्रत्यक्ष संघटनेच्या व्यासपीठावर खूप क्वचित वेळा असत.
निळू भाऊंनी स्वतःहून आठवड्यात दोन दिवस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आमच्या कामाला जोर आला. मला आठवतं आता-आतापर्यंत ठरल्याप्रमाणे निळूभाऊ सलग आमच्या सोबत असायचे. सकाळी आठ वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही त्यांचे कितीतरी कार्यक्रम निश्चित करून ठेवत असू आणि निळू भाऊ त्या सर्व कार्यक्रमांना सारख्याच उत्साहाने हजेरी लावत.
एवढा मोठा नट मात्र संघटनेच्या कामात त्यांनी कधीही आपल्या मोठेपणाची प्रौढी मिरवली नाही. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये ते अगदी सामान्य म्हणून काम करताना मी पाहिले आहे. संघटनेच्या कामात मूळातच पैशांची वानवा असल्याने ब-याचदा त्यांच्या प्रवासाची सोय रेल्वेच्या सेकंड स्लीपरमधून केली जायची तर मुक्कामासाठीही मोठ्या लॉज परवडत नसल्याने स्थानिक पातळीवर ती गव्हर्मेंट गेस्ट हाऊसमध्ये केली जायची. तिथली अस्वच्छता व गैरसोयी अशा गोष्टी असूनही निळू भाऊंनी त्याबद्दल आमच्याकडे कधीही तक्रार केली नाही. त्यामुळेच मला त्यांच्यासोबत काम केल्याचा मनस्वी अभिमान वाटतो.
पुरोगामी चळवळीचा आणि विचारांचा कोणताही कार्यक्रम असो लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि कार्यक्रमांना गर्दी व्हावी यासाठी आम्ही निळू भाऊंमधील नटाचे ग्लॅमर वापरण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांना त्यांच्यातील नटापेक्षा कार्यकर्ताच अधिक भावल्याचे माझ्या लक्षात आले.
चळवळीचे अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे यायचे आपल्या खाजगी अडचणी सांगायचे आणि निळू भाऊ त्यांना आपल्या खिशात हात घालून असेल तेवढी रक्कम द्यायचे. सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना यातून आमच्या समोर आली. यासाठी आम्ही निधी उभा करायचे ठरविल्यानंतर त्यासाठी नाटकांचे शो करणे असो की विद्यार्थी उपवास कार्यक्रम (प्रत्येक विद्यार्थ्याने एक दिवसातील एक वेळ उपास करून त्यातून वाचलेले पाच रुपये समितीला देणे अशी ही कल्पना होती. या उपक्रमात 5 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 25 लाख रुपये निधी गोळा केला होता.) प्रत्येक वेळला या कार्यक्रमाच्या प्रचाराची जबाबदारी निळू भाऊंनी आपण होऊन स्वीकारली. (पुढील पानावर...)
शब्दांकनः विकास शिरपूरकर |