शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

बचत महत्त्वाचीच...

NDND
जागतिक मंदीची झळ जवळपास सगळ्याना बसत आहे. अशा परिस्थितीत बचत करणे ही सगळ्याचीच गरज झाली आहे. आगामी काळ हा अधिक त्रासदायक असेल. त्यामुळे त्या काळात आपल्याकडे पैसे असणे गरजेचे आहे. म्हणूनच आता आपल्या खर्चाला लगाम घालणे गरजेचे आहे.

काळ काही सांगून येत नाही. त्यामुळे आपण भविष्याचे नियोजन आताच केले पाहिजे. जीवनात सुख-दु:ख परमेश्वराने प्रत्येकाच्या पानावर सारखीच वाढून ठेवली आहेत. भविष्याचे नियोजन नसल्यास 'गरजवंताला अक्कल थोडी', म्हणून आपल्याला कुणासमोरही हात पसरावे लागतील

पैसे कमवण्यासाठी खूप वेळ लागतो. थेंबे थेंब तळे साचे, या म्हणीप्रमाणे पैसा जमा करावा लागतो. मात्र, पैसा खर्च करायला काहीही वेळ लागत नाही. म्हणूनच खर्चाचेही नियोजन केले पाहिजे. सुरवातीला ही बाब कठीण वाटेल. पण हळूहळू त्याची सवय झाल्यास ती सरावाने अंगवळणी पडेल.

खर्चाचा हिशोब ठेवा-
प्रत्येक महिन्याचे नियोजन करून आपण केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवणे गरजेचे आहे. हिशेब ठेवल्याने खर्चाचा अंदाज येतो. खर्चाचा हिशेब ठेवल्याने वायफळ खर्च कुठे होत आहे. हे चटकन कळते. आपल्या आवकेमधील एक भाग आपण बचत म्हणून बाजूला ठेवला पाहिजे. त्यामुळे आपल्याला खर्चाचा अंदाज तर येईलच. शिवाय बचतही करता येईल.

लक्ष्य निर्धारित करा-
आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खर्चाला लगाम घातला पाहिजे. त्यामुळे डोळ्यासमोर लक्ष्य ठेऊन नियोजन केले पाहिजे. आपल्या आवकेनुसार आपल्याला कोणत्या किंमती वस्तू खरेदी करायच्या आहे. याचे नियोजन केले पाहिजे. त्यानुसार आपले बजेट निर्धारित करून त्या वस्तूची खरेदी केली पाहिजे.

बचत खाते सगळ्यात उत्तम-
अपाल्या आवकेमधील काही भाग आपण एखाद्या राष्ट्रीयकृत बॅंकेचे बचत खाते सुरू करून त्यात नियमितपणे टाकला पाहिजे. बॅंकमध्ये सेव्हिंग करणे हा बचतीचा उत्तम पर्याय आहे. आपल्याकडे कमी पैसे शिल्लक राहिले तर त्यानुसार खर्च करायची सवय आपल्याला लागते. हल्ली बॅंक व पोस्ट कार्यालयात बचत खाते सुरू करण्यासाठी अनेक प्रकारच्या फायद्याच्या योजना उपलब्ध आहेत.

पैसा ही जीवनातील महत्त्वाची गोष्ट आहे. पैसा कमावण्यासाठी आपण जसे नियोजन करतो, त्याचप्रमाणे खर्चाचेही नियोजन करणे आवश्यक आहे.