शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

गर्भधारणा कशी होते?

खरोखरच निर्मिती ही एक थक्क करणारी गोष्ट आहे. त्याच्या जितके खोलात शिराल तितके कमीच. प्रश्नोत्तरांची मालिका एके ठिकाणी संपते आणि सर्वशक्तिमान निर्मात्याबद्दल शरणागती निर्माण होते. कशी होते मानवी गर्भधारणा, हे बघण्याआधी प्रथम मानवी गुणसूत्रांविषयी सांगणे आवश्यक आहे. आपल्या शरीरातील सर्व पेशींमध्ये ४६ गुणसूत्रे असतात. त्यापैकी ४४ गुणसूत्रांमुळे आपली शारीरिक, वैचारिक व मानसिक लक्षणे उरतात. स्त्रियांमध्ये ४४ व्यतिरिक्तही दोन ‘X’ क्रोमोसोम्स’ असतात, तर पुरुषांमध्ये, XY’’स्त्रियांच्या अंडकोषात मात्र असंख्य बीजांडे जन्मापासूनच सुप्तावस्थेत असतात. या बीजांडांमध्ये मात्र २३ म्हणजे (२२ + ‘X’ ) ही गुणसूत्रे असतात आणि पुरुषांच्या अंडकोषात अनेक शुक्रजंतू असतात आणि त्या शुक्रजंतूंमध्ये (२२ + ‘Y’) ही गुणसूत्रे असतात.

मासिक पाळी सुरू झाल्यानंतर साधारण १४व्या दिवशी स्त्रीच्या अंडकोषातून एक बीजांड बाहेर पडते. बीजनलिकेच्या टोकाशी असलेल्या बोटांच्या अकाराच्या ‘फ्रिंब्रियां’मुळे हे स्त्रीबीज बीजनलिकेमध्ये शिरते. या बीजामध्ये फलित होण्याची क्षमता साधारणत: २४ तासांपर्यंत असते. या कालावधीत जर शुक्रजंतू उपलब्ध झाले तर गर्भधारणा होण्याचा संभव असतो. शारीरिक संबंधांनंतर शुक्रजंतू गर्भाशयातून बीजनलिकेत शिरतात. या गर्भनलिकेत स्त्रीबीजाच्या चारही बाजूंनी शुक्रजंतू चिकटतात. एका रासायनिक प्रक्रियेमुळे स्त्रीबीजाच्या सभोवताली असलेल्या Zonapellucida या आवरणामध्ये छेद निर्माण होतो व शुक्रजंतूमधील केंद्रक म्हणजे गुणसूत्र असलेला भाग स्त्रीबीजाच्या आत शिरतो. त्याच वेळी असे काही बदल होतात, ज्यामुळे एकापेक्षा जास्त शुक्रजंतू स्त्रीबीजाच्या आत शिरू शकत नाहीत.

अशा, रीतीने फलित झालेल्या स्त्रीबीजाला 'Zygote' असे म्हणतात. ही मानवी अस्तित्वाची सर्वात पहिली खूण. यानंतर हे फलित स्त्रीबीज दोन-चार-आठ-सोळा अशा भौमितिक प्रमाणात वाढते व गर्भावस्थेची सुरुवात होते. या वेळी मात्र या फलितामध्ये स्त्रीकडून आलेली २२ + ७ आणि पुरुषांकडून आलेली २२ + Y अशी ४६ गुणसूत्रे असतात. जर Y गुणसूत्रे असलेल्या शुक्रजंतूंमुळे स्त्रीबीज फलित झाले तर मुलाचा गर्भ निर्माण होतो व X गुणसूत्र असलेल्या शुक्रजंतूंमुळे स्त्रीबीज फलित झाले तर मुलीचा गर्भ निर्माण होतो.

वरील माहितीवरून हे नि:संदिग्धपणे समजते की, मुलगा/मुलगी होणे याला स्त्री नव्हे, तर पुरुष जबाबदार असतो. एकपेशीय मानवी अस्तित्वानंतर मात्र जेव्हा जेव्हा पेशींचे विभाजन होते ते 'Mitosis' या पद्धतीनेच होते, म्हणजे गुणसूत्रांची संख्या सर्व पेशींमध्ये समान होते. फक्त स्त्री/पुरुष बीजांमध्ये हे विभाजन 'Meiosis' या पद्धतीने होते. म्हणूनच स्त्री/पुरुष बीजांमध्ये अर्धी म्हणजेच २३ गुणसूत्रे असतात. स्त्रीबीज फलित झाल्यापासून साधारण ५-७व्या दिवशी हा गर्भ गर्भाशयात पोहोचतो. या पायरीवर या गर्भाला (blastomere) असे म्हणतात. या वेळी या गर्भपेशींमध्ये वेगवेगळी इंद्रिये बनवण्याची क्षमता आलेली असते. हा गर्भ, गर्भाशयाच्या आतील आवरणाला चिकटणे व वाढीस लागणे Implantation ही अत्यंत महत्त्वाची पायरी गर्भधारणेमध्ये आहे. जितक्या वेळा स्त्रीबीजे फलित होतात त्यापेक्षा अनेक वेळा अयोग्य पद्धतीने झालेल्या गुणसूत्रीय बदलामुळे गर्भ ही पायरी ओलांडू शकत नाहीत व अगदी सुरुवातीच्या काळातील गर्भपात घडू शकतो.

गुणसूत्रीय विभाजनातील खास पद्धतीमुळे (Crossover) गुणसूत्रीय प्रथिनांची रचना बदलते. हेच कारण आहे. या मानवी विविधतेचे स्त्री व पुरुष बीजाच्या संयोगातून १०१२ इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे Zygote (फलित बीजे) व अर्थात इतक्या वेगळ्या प्रकारची बालके निर्माण होऊ शकतात. आहे ना ही थक्क करणारी गोष्ट!

पाळी चुकणे ही गर्भवती असल्याची पहिली खूण बहुतेक स्त्रियांना ध्यानात येते; परंतु त्या आधीच म्हणजे ovulation झाल्यानंतर ११व्या दिवशी जर रक्ताची तपासणी केली तर गर्भवती असल्याचे निदान होऊ शकते. अर्थात यासाठी वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे.

सहाव्या आठवड्यात सोनोग्राफी करून गर्भ दिसू शकतो व सातव्या आठवड्यात हृदयाची हालचाल दिसल्यावर हा गर्भ पुढील वाढीसाठी सक्षम आहे हे समजते.