शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

'अभिव्यक्ती म्हणजे दुस-यावर चिखलफेक नव्हे'

किरण जोशी-

डॉ. आनंद यादव यांच्या समर्थनार्थ समस्त साहित्यिकांनी महामंडळाविरोधात मोर्चा उघडलेला असतानाच संमेलनाच्या व्यासपीठावर मात्र डॉ. यादव यांच्या भूमिकेवर साहित्यिकांकडून अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठविली जात आहे.

साहित्यिकांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विपर्यास केला जात आहे. अभिव्यक्तीचा अर्थ दुस-यावर चिखलफेक करणे असे नव्हे तर हे विचारांचे आणि अनुभूतीचे स्वातंत्र्य आहे, याचे भान ठेवून साहित्य निर्मिती केली पाहिजे असा टोला हाणत साहित्यकांनी डॉ. यादव यांनी घरचाच आहेर दिला.

संतसाहित्य लिहिताना लोकश्रष्ठेचे भान ठेवावे असा सुर पहिल्या परिसंवादात व्यक्त करण्यात आला होता. 'कर्तबगार स्त्रियांच्या कर्तृत्वाचे यथायोग्य प्रतिबिंब मराठी साहित्य संमेलनात कितपत उमटले आहे? ' या विषयावर झालेल्या परिसंवादात ज्येष्ठ लेखक ह. मो. मराठे यांच्यासह इतर वक्त्यांनी मूळ विषयाला बगल देत डॉ. यादव यांनी अभिव्यक्ती शिकविण्याचा प्रयत्न केला.

डॉ. सुलक्षणा कुलकर्णी, मधू जामकर, भगवान ठाकुर, सुषमा करोगल, जया द्वादशीवार यांनी या परिसंवादात सहभाग घेतला.

मराठे म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विपरीत अर्थ गेले काही दिवस आपल्याकडे काढला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुस-यावर चिखलफेक करणे नसून ते विचारांचे आणि अनुभूतीचे स्वातंत्र्य आहे. त्याचा अर्थ नीट समजावून घेत लेखन झाले पाहिजे. स्त्रियांच्या व स्त्रियांविषयीच्या लेखनातही त्याचा अर्थ स्पष्ट आणि सुस्पष्ट असला पाहिजे असे ते म्हणाले.

वनमालाबाईंच्या जीवनातील कडू-गोड प्रसंग, अभिनेत्री शांता हुबळीकर यांच्या 'आता कशाला उद्याची बात' या चरित्रात आलेला जीवनप्रवास अत्यंत शोकात्मक असून त्यांच्या यशस्वी जीवनाच्या कतृत्वपट त्यामध्ये आलेला नाही. असे का होते याचा विचार झाला पाहिजे असे सांगून ह. मो. मराठे यांनी लेखकाने आपला साहित्यिक विवेक वापरण्याची व तारतम्य बाळगून लेखन होण्याची आशा व्यक्त केली.

डॉ. सुलक्षणा कुलकर्णी यांनी कर्तुत्वान स्त्रिया मराठी साहित्याने कायमच दूर कशा ठेवल्या याची उदाहरणे देत राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांच्यावर भा रा तांबे, कुसुमाग्रज, विजया जहागीरदार यांनी लिहिलेल्या साहित्यकृतीचा उहापोह केला.

मधू जामकर यांनी स्त्रियांनी केलेल्या विविध लेखनाचे दाखले दिले. लक्ष्मीबाई टिळक, ताराबाई शिंदे, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, आनंदीबाई शिंदे अशा अनेक स्त्रियांविषयी अजूनही चांगले, त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे लिहिले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली.

सुषमा करोगल यांनी महाराष्ट्रातील कर्तुत्वान स्त्रिया या आजवरच्या मराठी लेखकाला कळल्याच नाहीत किंवा पुरूषसत्ताक पद्धतीने कायमच त्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. असा मुद्दा मांडून विदेशात स्त्रियांचे कसे कौतुक होते, त्यांच्यावर किती भरभरून लिहिले जाते याचा आलेख मांडला. भगवान ठाकून यांनी दलित स्त्रियांची आत्मकथने व त्यांचे कर्तृत्व याविषयी आपले विचार व्यक्त केले.

ह. मो. अभ्यासाशिवाय प्रगटले
'अभ्यासेविण प्रकटू नये' असा सल्ला शंकर अभ्यंकर यांनी याच व्यासपीठावर दिला होता. मात्र, ह. मो. मराठे यांनी याचीच प्रचिती आणून दिली. महाराष्ट्रात महिलांना मंत्रीपद कुणाला मिळाले आहे का? असा सवाल करून ह. मो. मराठे यांनी महाराष्ट्रामध्ये कर्तृत्वान स्त्रिया झाल्या नसल्याची खंत व्यक्त करताना 'आपल्याकडील राजकारणामध्ये शीला दीक्षित, मायावती, जयललिता अशा स्त्रिया का झाल्या नाहीत' असे वक्तव्य केले. त्यावेळी उपस्थित श्रोत्यांनी त्यांना देशातील सर्वोच्य पदावर असणा-या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नावाची आठवण करून देत त्यांना भानावर आणले. 'आपण ही बाब विसरलो' अशी कबुली त्यांनी दिली. इतर प्रांतातील महिला राजकारण्यांबाबतचे त्यांचे वक्तव्य मात्र उपस्थित महिलांना चांगलेच झोंबले. दीक्षित, मायावती, जयललिता यांच्यासाख्या स्त्रिया महाराष्ट्रात झाल्या नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र वाचला अशी प्रतिक्रीया व्यक्त केली जात होती.