५० रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा करून ती आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविण्यात येतील अशी घोषणा रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली. रेल्वे अर्थसंकल्प २००९-१० मध्ये प्रवाशांच्या सोयीसुविधांकडेही लक्ष पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुधारणा करण्यात येणार्या ५० रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील तीन रेल्वे स्थानके आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई), पुणे व नागपूर ही तीन रेल्वेस्थानके आहेत.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, स्थानकांचा हा विकास सार्वजनिक व खाजगी सहकार्याच्या माध्यमातून (पीपीपी) घडवण्यात येणार आहे. याशिवाय अन्य ५० स्थानकात बहुउद्देशीय संकुले बांधण्यात येतील. चांगले पेयजल, पुरेशी शौचालये, खानपान सेवा, प्रतिक्षा कक्ष आदी प्राथमिक सुविधांनी सज्ज अशी ३७९ 'आदर्श स्थानके' विकसित करण्याचे रेल्वेने ठरवले आहे.
याशिवास प्रवाशांना नानाविध सुविधा पुरविणे प्रस्तावित आहे. प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाडयांमध्ये किमान एक डॉक्टर तैनात करण्यात येईल. प्रवाशांना रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात येणार आहेत. सुरुवातीला ही सेवा चेन्नई, बंगळूरु, दिल्ली, हैद्राबाद, मुंबई, कोलकाता आणि भुवनेश्वर या स्थानकांवर देण्यात येणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमध्ये हा प्रकल्प मुख्यत्वाने राबवल्यानंतर त्याच्या यशापयशावर तो अन्य शहरात कसा राबवावयाचा ते ठरविण्यात येईल, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
आज दुपारी सादर झालेल्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात विमानात असतात तशी व्हॅक्युम शौचालये, काही गाडांमध्ये बसविण्याचा मुद्दाही मांडण्यात आला. दोन तासांपेक्षा अधिक काळ प्रवास असणार्या गाडांमध्ये शौचालयाची सेवा पुरविण्याची रेल्वेची योजना असल्याचेही बॅनर्जी म्हणाल्या. डीइएमयू आणि एमइएमव्ही गाडांमध्ये स्त्रिया व मुले यांना ही समस्या भेडसावते त्यावर रेल्वेने ही उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. सध्या ४ तासांपेक्षा कमी प्रवासाकरिता वापरल्या जाणार्या गाडयांमध्ये शौचालयाची सुविधा नाही.
लोकसभेत बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, तिकिट काढण्यासाठी रेल्वेस्थानकापर्यंत जाणे कठीण जात असलेल्या गरीबाला बाजारात, मोहल्ल्यात किंवा अन्यत्र गर्दीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या अशा प्रकारच्या तिकिट गाडीतून तिकिटे घेता येतील. यावर्षात अशा ५० मोबाईल गाडया दाखल करण्यात येणार आहेत. याशिवाय ई-तिकिटींग सेवेचा विस्तार घडविण्यात येणार असून तक्ता तयार झाल्यावर देखील एखाद्याला ई-तिकिट रद्द करायचे असेल तर ती प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रतिक्षा यादीवर असणार्यासाठी एसएमएसद्वारे ताजी स्थिती कळविण्याची सोय आणि निश्चित केलेल्या तिकिटांना बर्थ क्रमांक कळवणे या सोयी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होतील, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. |