महागाई दर वाढत असला तरी चिंतेची बाब नसून, आगामी काळातही देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेले आर्थिक पॅकेज सुरूच राहणार असल्याचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
रिझर्व्ह बँकेने आपल्या आर्थिक धोरणात कोणतेही बदल न केल्याने आता सरकार आर्थिक पॅकेज मागे घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु सरकार आगामी काळातही आर्थिक पॅकेज सुरूच ठेवणार असल्याचे प्रणव यांनी म्हटले आहे.
मंदीचा प्रभाव कमी होत असल्याने आता सरकार आर्थिक मदत थांबवेल अशी भीती देशातील उद्योगांना वाटत आहे. परंतु असा कोणताही निर्णय सरकारने घेतला नसून, आगामी काळातही सरकार आपली आर्थिक मदत उद्योगांसाठी सुरूच ठेवणार असल्याचे प्रणव यांनी स्पष्ट केले आहे.