उद्यापासून सुरू होणार्या नवीन आठवड्यात बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होण्याची भिती तज्ज्ञांना वाटत आहे.त्यामुळे बाजार या नव्या आठवड्यात कधी वर तर कधी खाली असा सापशिडीचा खेळ खेळेल असे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या आठवड्यात बाजारात चांगली गुंतवणूक झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात बीएसईत 4.26 टक्के वाढ दिसून आली होती. तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीत 3.77 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
चालू आठवड्यात यात अनेक उलटफेर दिसून येतील असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आरबीआयने अचानक शुक्रवारी सीआरआर दर (रोख रक्कम निधी) वाढवण्याची घोषणा केल्याने बाजारात सोमवारी याची प्रतिक्रिया दिसून येऊ शकेल.
हे दर वाढल्याने गृह आणि इतर कर्ज वाढण्याची दाट शक्यता असल्याने बँकांच्या समभागांवर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो असे तज्ज्ञांना वाटते.
या आठवड्यात सरकारने जाहीर केलेल्या आकड्यांत चलनवाढीचा दर घसरल्याचे दिसून आले आहे. हे दर 7.41 टक्क्यांवरून 7.14 टक्क्यांवर आले आहेत. यामुळे महागाई काहीशी कमी होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
परिणामी गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक संदेश गेल्याने बाजारावरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो असे तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे बाजारात चलनवाढीची सकारात्मकता आणि सीआरआरदरांची नकारात्मकता असे चित्र या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळेल.
|