इंधन दरवाढ झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या नकारात्मक बातम्यांचा सामना, माहिती तंत्रज्ञान, बँक आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांनी केल्याने मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाला चांगले पाठबळ मिळाले. या आधाराच्या जोरावर आज बाजार 255 अंशांनी वधारला, तर निफ्टीने 90 अंशांची वाढ घेतली. पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीनंतर बुधवारी बाजारात तब्बल 447 अंशांची जबरदस्त घसरण झाली होती. त्या आधारावर बाजार आज प्रारंभीच्या सत्रात भीतीच्या सावटाखालीच सुरू झाला.
निर्देशांक कालच्या 15514.79 अंशांच्या तुलनेत 15479.65 अंशांवर खाली आणि नंतर याहूनही घसरत 15314.02 अंशांपर्यंत घसरला. यानंतर बाजारात चांगले पाठबळ मिळाल्याने 500 अंशांची उडी घेत बाजार 15814.80 अंशांवर पोहचला.
बाजार बंद होताना 254.93 अंश अर्थात 1.64 टक्क्यांच्या वाढीसह 15769.72 अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात अनुक्रमे 2.92 आणि 15.33 अंशांची किरकोळ वाढ झाली. एनएसईचा निफ्टी 90 अंश अर्थात 1.99 टक्क्यांच्या वाढीसह 4676.95 अंशांवर पोहचला.
|