शनिवारी संपलेल्या आठवडयात सेन्सेक्स ९७८८ वर उघडला. आठवडयातील सेन्सेक्सचा उच्चांक १०९४५ होता तर नीचांक ९६३१ होता. सप्ताहाअखेर सेन्सेक्स ९९६४ अंशावर बंद झाला. या आठवडयात सेन्सक्समध्ये १७६ अंशाची किरकोळ वाढ झाली. गेल्या आठवडयाच्या विश्लेषणात नमूद केल्याप्रमाणे शेअर बाजारातील उत्साह कायम रहाण्यासाठी सेन्सेक्स ८७०० अंशाच्या वर बंद होणे आवश्यक होते. गेल्या आठवडयात खरेदीचा जोर कायम राहून सेन्सेक्स ९९६४ वर बंद झाला ही समाधानकारक बाब आहे. त्याचबरोबर १०७०० अंशावरचा प्रतिकार दूर करण्यासाठी सेन्सेक्सला शिकस्त करावी लागणार आहे, हे देखील स्पष्ट झाले. ४/११/२००८ रोजी सेन्सेक्स १०६३१ वर बंद झाल्यावर ५/११/२००८ रोजी विक्रीचा मारा होउन सेन्सेक्स ५११ अंशांनी घसरून १०१२० वर बंद झाला. त्यामुळे ९८०० ते १०७०० या पट्टयामध्ये अजून काही काळ जमवणूक होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकदारांनी सध्या महा भांडवली कंपन्यांवर लक्ष केंद्रीत करावे कारण सेन्सेक्समध्ये नवीन जोम येईल तेव्हा महा भांडवली कंपन्या अग्रेसर रहातील. अशाच काही कंपन्यांपैकी टीसीएस ही कंपनी आहे. टीसीएसचा समभाग ५५० वरचा प्रतिकार दूर सारून ५९० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ४५० वरती स्टॉप लॉस ठेवून गुंतवणुकीचा विचार करावा.( या स्तंभात व्यक्त केलेली मते विविध स्त्रोतांच्या अभ्यासातून आलेली आहेत. ती अचुक असतीलच असे नाही. त्यामुळे कृपया, गुंतवणुकदारांनी स्वतःच्या जोखमीवर गुंतवणूक करावी. त्यास स्तंभलेखक वा वेबदुनिया जबाबदार रहाणार नाही.) |