भारतीय परंपरेत तेहतीस कोटी देवांना मान्यता दिली आहे. हे सर्वविदित आहे. या देवांमधला सगळ्यात सोपा देव म्हणजे महादेव होय. शंकराला-महादेवाला साधा भोळा देव आणि साध्या भोळ्यांचा देव असेही संबोधले जाते. थोड्याश भक्तीने पावणारा, भक्ताच्या आर्त हाकेला चटकन 'ओ' देणारा देव म्हणजे महादेव, अशी त्याची प्रसिद्धी आहे. परंतु याच कारणामुळे हा देव कित्येकदा मोठ्या अडचणीत सापडतो. असंख्य देवांपैकी भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा महादेवासमोर लागलेल्या दिसतात. कोणी एखादे बेलाचे पान वाहनू, त्याला नोकरी लवून दे म्हणतो तर कोंणी पांढरे फूल वाहून पटकनलग्न जमू दे म्हणतो. कधी कधी तर परस्पर विरोधी मागण्या करणारे भक्तही समोर उभे राहतात. एकजण 'अ' ची बदली दुरसीकडे कर म्हणतो तर, त्याच्याच पाठीमागचा 'अ' ची बदली मुळीच करू नको म्हणतो. या सर्व गोष्टींमुळे हा भोळा सांब पार वैतागून गेला.
| | श्री विष्णू म्हणाले, 'तू माणसाच्या हृदयात खोल लपून रहा. ही माणसे बाहेरच्याच बारा भानगडीत इतकी गुंतली आहेत की, त्यांना आपल्या आत डोकावून पाहण्याची अजिबात फुरसद नाही. |
| |
कुठे जावे, कुठे लपावे म्हणजे भक्तांचा ससेमिरा पाठीमागे लागणार नाही, याचा तो विचार करू लागला. हिमालयात गौरीशंकर जाऊन पाहिले परंतु तेथेही भक्तांनी पिच्छा सोडला नही. विराण-वैराण स्मशनात वास्तव्य करून पाहिले पण तेथेही भक्त येऊन पोहोचलेच. शेवटी तो भगवान विष्णूंकडे गेला आणि म्हणू लागला, देवा! कसेही करून मला अशी जागा दाखव की, जेथे माझे तथाकथित भक्त पोहोचू शकणार नाही, विष्णूंनी थोडा विचार केला आणि शंकराला एक नामी सल्ला दिला. श्री विष्णू म्हणाले, 'तू माणसाच्या हृदयात खोल लपून रहा. ही माणसे बाहेरच्याच बारा भानगडीत इतकी गुंतली आहेत की, त्यांना आपल्या आत डोकावून पाहण्याची अजिबात फुरसद नाही. तू वर्षानुवर्षे या हृदय-गाभार्यात निवांत पडून रहा.' शंकराने तात्काळ हा सल्ला मानला. तेव्हापासून परमेश्वराने माणसाचे हृदय आपले घर केले आहे. त्यांच्या निकट इतका मोठा ठेवा असूनही ते त्याकडे ढुंकूनही पहात नाहीत. 'तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासी' अशी त्यांची स्थिती झाली आहे.
खरोखरच आजकालचे आपले जीवन इतके धावपळीचे, धकाधकीचे आणि ताणतणावचे झाले आहे की, आपल्याला आपल्या स्वत:च्या आत डोकावून पाह्यला थोडीही सवड नाही. अतिशय बहिर्मुखी जीवन आपण व्यतीत करीत आहोत. बाह्य व्याप आटोपल्यानंतर आपण स्वत:कडे लक्ष देतो, परंतु तेही अगदी वरवर, केवळ बाह्यांगापुरते. आपण आपलेच प्रतिबिंब आरशात चारचारदा पाहतो. परंतु आपल्या खर्या 'स्व'कडे एकदाही नजर टाकीत नाही.
आपल्या देहाशी सहजपणे निगडीत असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला श्वास. परंतु तोही आपण अगदी गृहीत धरलेला असतो. विशेष कारणाने आपला श्वास घुसमटला किंवा श्वास घेण्यात अडथळा निर्माण झाला तरच आपले श्वासाकडे लक्ष जाते. आपला श्वास म्हणजे वास्तविक आपला प्राण होय, अस्तित्व होय. तोच वास्तविक आपला परमेश्वर होय. या श्वासाच्या लयीकडे आपण नीट लक्ष दिले तर आपल्या शरीरातला अणुरेणू या अस्तित्वाने, चैतन्याने भारला जातो. त्याच्यात जणू नवप्राण संचारतात. शरीरातील अशुद्धता निघून जाण्याची प्रक्रिया सुरू होते. येणारा श्वास, जाणारा श्वास आणि त्यावरील आपले अवधान म्हणजे जणू अजपा जपच होय. प्रत्येक श्वास साक्षात त्या अंतस्थ परमेश्वराशी जोडला जातो आणि आपल्या साडे-तीन हातांच्या शरीरात प्रसन्नतेची, आल्हादाची कारंजी फुटू लागातात. अक्षय आनंद-सरिता आत दुथडी भरून वहात असते. परंतु आपण बाहेरच्या कोलाहलात अडकलेले असतो. या सरितेचा खळखळाट आपल्या कानापर्यंत पोहाचतच नाही. भरगंगेत अवगाहन करूनही आपण कोरडेच राहतो.
|