आज वसुंधरा दिन. या वसुंधरेवर आपण जन्म घेतो, वाढतो आणि तिच्याच मातीत मिसळून शेवटचा श्वास घेतो. आख्खं आयुष्य आपण या पृथ्वीतलावर काढूनही तिच्याविषयी आपल्याला किती माहिती असते? फार कमी. म्हणूनच या वसुंधरेविषयीच्या काही मनोरंजक बाबींची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत.
या जगातील सगळ्यात तप्त जागा कोणती? लिबियातील एल अझिझा ही जगातील सगळ्यात तप्त जागा आहे. १३ सप्टेंबर १९२२ ला या जागी जगातील आतापर्यंतचं सगळ्यात उष्ण म्हणजे ५७.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
जगातील सगळ्यांत थंड ठिकाण? अंटार्क्टिकावरील वास्टोक हे पृथ्वीतलावरचं सगळ्यात थंड ठिकाण म्हणून नोंदवलं गेले आहे. २१ जुलै १९८३ रोजी तेथील तापमान उणे ८९ इतके नोंदवले गेले आहे.
अवकाशातून दरवर्षी किती धूळ पृथ्वीवर पडते? याचे प्रमाण वेगवेगळे सांगितले जाते. पण यूएसजीएस या संस्थेच्या मते दरवर्षी एक हजार मिलीयन ग्रॅम्स किंवा अंदाजे एक हजार टन धूळ दरवर्षी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते.
जगातील सर्वांत उंचीवरून कोसळणारा धबधबा कोठे आहे? व्हेनेझुएला येथील एंजल फॉल्स हा सर्वांत उंचीवरून म्हणजे जवळपास ३२१२ फूटांवरून ( ९७९ मीटर) जमिनीवर कोसळतो.
गडगडाट कशामुळे होतो? तुम्ही वीज चमकल्यामुळे असे उत्तर द्याल. पण ते अर्धसत्य आहे. वीज चमकल्याने आजूबाजूचे ढग अत्यंत तापतात. त्यांच्यात निर्माण झालेली उष्णता सूर्यापेक्षा पाच पटीने जास्त असते. या अचानक निर्माण झालेल्या उष्णतेने हवा ध्वनीपेक्षा जास्त वेगाने प्रसरण पावते. त्यामुळे हवा दाबली जाऊन चकचकाट निर्माण होतो आणि त्यातून गडगडाट ऐकू येतो.
जगातील सर्वांत मोठा ज्वालामुखी कोठे आहे? अमेरिकेच्या हवाई बेटांवरील मौना लोआ हा ज्वालामुखी जगात सगळ्यात मोठा आहे. त्याची उंची त्याच्या बेसहून पन्नास हजार फूटांहून (म्हणजे साडेनऊ मैल वा १५.२ किलोमीटर) अधिक आहे. मंगळावर असलेला ऑपिंम्पस मोन्स हा ज्वालामुखी तर सोळा मैल म्हणजे २६ किलोमीटर उंचीचा आहे.
सर्वांत भयंकर भूकंप कोठे झाला होता? मध्य चीनमध्ये १५५७ मध्ये झालेला भूकंप पृथ्वीवरचा आतापर्यंतचा सर्वांत भयानक भूकंप मानला जातो. प्रामुख्याने मऊ दगड असलल्या गुहांमध्ये लोक रहात असलेल्या भागात हा भूकंप झाला आणि जवळपास ८ लाख ३० हजार लोकांना गिळंकृत करून गेला. त्याच चीनमध्ये अगदी आत्ता आत्ता म्हणजे १९७६ मध्ये तांगशान येथे झालेल्या भूकंपात अडीच लाख लोक मरण पावले होते.
|