सन १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या संग्रामात पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा अखेर काळाच्या पडद्याआड गेले. युद्धात कधीही शरणागती माहित नसलेला हा निधड्या छातीचा शिपाई चेन्नईच्या वेलिंगटन रूग्णालयात मृत्यूला तेवढा शरण गेला.
माणेकशा यांचे नाव सुवर्णाक्षराने नोंदवावे अशीच त्यांची कामगिरी आहे. यांच्या सुवर्णमयी कामगिरीमुळेच त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, फिल्ड मार्शल असे सन्मान मिळाले. अमृतसरमध्ये ३ एप्रिल १९१४ रोजी सॅम होर्मूसजी फ्रेमजी जमशेदजी माणेकशा यांचा एका पारशी कुटुंबात जन्म झाला. लष्करात जायचे असे जणू ठरवले होते. आपले आयुष्य लढाईशी बांधलेले आहे, हेही त्यांना कळाले असावे. कारण या माणसाचे आयुष्य लढाया खेळण्यातच गेले.
आयुष्यातील पहिली लढाई सॅम खेळले ते दुसर्या महायुद्धादरम्यान. त्यावेळी ते १७ व्या इन्फ्रंट्री डिव्हिजनमध्ये होते. बर्मा (आताच्या म्यानमारमध्ये) जपानी सैनिकांविरोधात सॅम पहिल्यांदा युद्धाला भिडले. सेतांग नदीच्या किनार्यावर जपान्यांशी लढत असताना सॅम गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पोटात अनेक गोळ्या लागल्या होत्या. त्यांचे वाचणे जवळपास अशक्य होते. त्यांना गंभीर अवस्थेत रंगूनच्या सैनिकी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी एका सर्जनने त्यांचे ऑपरेशन करण्यापूर्वी त्यांना विचारले, what happen to you" त्यावेळी हसत हसत त्यांनी सांगितले "I was kicked by a bloody mule!" गंभीर अवस्थेतही विनोद करण्याच्या त्यांच्या दिलखुलास स्वभावाने प्रभावित झालेला सर्जन म्हणाला, "Given your sense of humour, it will be worth saving you!"
त्यांचे दुर्दम्य साहस पाहून बर्माची आघाडी सांभाळणारे कमांडिग ऑफिसर मेजर जनरल डि. टी. कॉवनही प्रभावित झाले होते. जपान्यांनंतर मृत्यूशी लढाई लढत असणार्या माणेकशा यांना त्यांनी रूग्णालयातच मिलिटरी क्रॉस प्रदान करताना ते म्हणाले होते, 'मृत्यूनंतर पदकांचे काहीही मोल उरत नाही. त्यामुळे ते योग्य वेळीच दिले गेले पाहिजे.'
मृत्यूला चकवा देऊन परतलेल्या सॅम यांची नियुक्ती नंतर क्वेटाच्या स्टाफ कॉलेजला झाली. नंतर परत ते जनरल स्लिम्स यांच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट म्हणून बर्माच्या जंगलात पुन्हा एकदा जपान्यांशी लढायला गेले. इथेही ते पुन्हा गंभीर जखमी झाले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर त्यांना स्टाफ ऑफिसर करून जपान्यांच्या शरणागतीसाठी इंडोनेशियात पाठविण्यात आले. तेथे त्यांनी दहा हजार युद्धकैद्यांच्या शरणागतीत महत्त्वाची भूमिका बजावली.
एकदा इंदिरा गांधींनी त्यांना थेट विचारले होते, आपण माझी सत्ता उलथवून देणार आहत काय? त्यावेळी सॅम म्हणाले. 'तुमचा उत्तराधिकारी व्हायला मी लायक आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? कारण तुमच्यासारखेच माझेही नाक लांब आहे.'
फाळणीनंतर १९४७-४८ मधील काश्मीरच्या लढाईतही माणेकशांचे योगदान महत्त्वाचे होते. पुढे नागालॅंडचा प्रश्न सोडविण्यातही माणेकशा यांचा पुढाकार मोलाचा ठरला. त्यासाठीच त्यांना १९६८ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. ७ जून १९६९ मध्ये माणेकशा यांनी जनरल कुमारमंगलम यांच्यानंतर भारताचे आठवे चीफ ऑफ द आर्मी स्टाफ अर्थात लष्करप्रमुखपद स्वीकारले. हा काळ त्यांची कसोटी पाहणारा ठरला. याच काळात बांगलादेश मुक्ती मोहीम झाली. पण माणेकशांच्या कुशल नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला नाक घासायला लावले. त्यांच्या पराक्रमामुळेच बांगलादेश हा स्वतंत्र देश निर्माण झाला. त्यांच्या या अतुलनीय देशप्रेमासाठीच १९७२ मध्ये पद्मविभूषण व १ जानेवारी १९७३ मध्ये पहिले फिल्ड मार्शल या मानद पदाने सन्मानित करण्यात आले.
माणेकशा यांच्यासंदर्भात अनेक किस्सेही उपलब्ध आहेत. १९७१ च्या लढाईनंतर एकदा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना थेट विचारले होते, आपण माझी सत्ता उलथवून देणार आहत काय? त्यावेळी सॅमही आपल्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत त्यांना म्हणाले. 'तुमचा उत्तराधिकारी व्हायला मी लायक आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? कारण तुमच्यासारखेच माझेही नाक लांब आहे.'
त्यानंतर गंभीर होत ते म्हणाले, 'हे बघा. मी माझे नाक इतर कोणत्याही भानगडीत घालत नाही. राजकारणाशी तर माझा दुरूनही संबंध नाही. आणि हीच अपेक्षा मी तुमच्याकडूनही करतो.' इंदिराजी यानंतर गप्पच बसल्या.
माणेकशा यांच्या दिलखुलासपणाचा आणखी एक किस्सा आहे. १९७१ च्या युद्धात ते पाकिस्तानी सेनेचे कॅप्टन मलिक यांच्या शौर्यावर ते खुश झाले होते. त्यांनी जाहीरपणे त्यांची स्तुतीही केली. एवढेच नव्हे तर त्यांना पदक द्यायला हवे अशी शिफारस त्यांनी परस्पर पाकिस्तानचे अध्यक्ष याह्या खान यांना केली होती.
चार दशके देशाची सेवा केल्यानंतर १५ जानेवारी १९७३ रोजी सॅम फिल्ड मार्शल पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते सैन्याशी संबंधित होते. सिमला करारादरम्यान काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची सुवर्णसंधी आपण गमावली याची त्यांना शेवटपर्यंत खंत होती.
आयुष्यभर लढाई खेळलेला हा माणूस एकदा या विषयावर बोलताना म्हणाला होता, 'मी अतिशय शांतताप्रिय माणूस आहे.' भारतासाठी आपले आयुष्य देणारा हा जॉंबाज शिपाई आता मात्र आपल्याला सोडून गेलाय. अनेक रोमांचक आठवणी सोडून. या निधड्या छातीच्या फिल्ड मार्शलला अखेरचा सलाम.