मंथन | बाबा आमटे | मराठी दिन | गांधी जयंती | सावरकर | ब्लॉग-कॉर्नर
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » आज-काल » मंथन » राजकारणाचा 'रियालिटी शो'
Feedback Print Bookmark and Share
 
PIBPIB
सध्या दिवस 'रियालिटी शो'चे आहेत. आयुष्यातील 'रिअल' परिस्थिती दाखविण्यापेक्षा 'रिअल' वाटावे असे काही दाखविण्याकडे सध्या बहुतांश टिव्ही चॅनल्सचा कल आहे. या शोमधली रडारड, वादविवाद, शेरेबाजी ही या शोला प्रसिद्धी देणारी ठरते. लोकही या शोला मोठा प्रतिसाद देतात. त्यामुळे त्याविरूद्ध कितीही आरडाओरड केली तरी रियालिटी शोची बोलवा काही कमी होत नाही. हल्ली या कार्यक्रमात सेलिब्रेटी मंडळीही सहभागी व्हायला लागली आहेत. 'न्यू रिलीज' सिनेमाचा मुहूर्त साधून अनेक कलावंत या शोमध्ये सहभागी होतात आणि आपल्या आकलनापलीकडे असलेल्या विषयांवर मत देऊन हसे करून घेतात. या कार्यक्रमात या सेलिब्रेटी मंडळींचे नखरेही दिसून येतात. केवळ प्रसिद्धी मिळविणे या पलीकडे या सार्‍यांचा दुसरा उद्देश काहीही नसतो. पण चर्चा तर होते. लोकांसमोर आपली एक प्रतिमा निर्माण करणे हा हेतूही साध्य होतो.

राजकारण्यांनाही या रियालिटी शोचे भलतेच आकर्षण आहे. म्हणूनच लालूप्रसाद यादवांपासून अनेक राजकीय नेते अनेक शोच्या व्यासपीठावर दिसून येतात. कदाचित हाच हेतू मनी धरून की काय कोण जाणे, खासदार रामदास आठवले व संजय निरूपमही 'बिग बॉस-२' या कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छुक होते. त्यात आठवलेंना ऐनवेळी डच्चू देण्यात आला. पण निरूपम सहभागी झाले. अर्थात नंतर 'मते' न मिळाल्याने त्यांनाही नंतर बाहेर पडावे लागले ही बाब अलहिदा. (तसेही निरूपम संसदेत गेले ते मागल्या दारानेच.) पण या शोमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व वाटावे असे काय त्यात आहे? एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना दिलेली निहित कर्तव्ये पार पाडण्यापेक्षा एखाद्या रियालिटी शोमध्ये तीन महिने बंदिवासात राहणे त्यांना जास्त महत्त्वाचे कसे वाटू शकते? लोकांनी त्यांना पाच वर्षांसाठी निवडून दिले ते त्यांची सेवा करायला, कुणा उटपटांग चॅनेलमध्ये सतत प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी नाही, हे त्यांना कळत नसेल काय?

निरूपम यांचे एकवेळ समजू शकतो. कारण ते प्रसिद्धीलोलूप आहेतच. कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रसिद्धी मिळावी हा त्यांचा हेतू कधी लपून राहिलेला नाही. म्हणून चॅनेलवरच्या रिकाम्या गप्पांमध्येही ते नेहमी सहभागी होऊन वाचाळगिरी करत असतात. पण जनतेच्या समर्थनावर निवडून गेलेला आठवलेंसारखा नेताही या सवंग प्रसिद्धीच्या प्रेमात पडतो, तेव्हा मात्र आश्चर्य वाटते.

  एक लोकप्रतिनिधी म्हणून निहित कर्तव्ये पार पाडण्यापेक्षा रियालिटी शोमध्ये तीन महिने बंदिवासात राहणे त्यांना जास्त महत्त्वाचे कसे वाटू शकते? लोकांनी त्यांना पाच वर्षांसाठी निवडून दिले ते त्यांची सेवा करायला, रियालिटी शो करायला नव्हे.      
चर्चेत रहायला आठवलेही नाना उद्योग करत असतात. त्यात शीघ्रकवित्वापासून उठून दिसेल अशा रंगसंगतीचे कपडे परिधान करण्यापासून सर्व काही ते करतात. पण तरीही त्यांच्यातला कार्यकर्ता नेता जागरूक असतो. पण बिग बॉसच्या निमित्ताने त्यांनी जो थयथयाट केला तो अनाकलनीय आहे. त्यांना या कार्यक्रमातून आयत्या वेळी वगळण्यात आले. या मागे दलितविरोधी मानसिकता असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय न्यायालयात जाण्याची धमकीही दिली. त्याचवेळी त्यांचे कार्यकर्तेही मागे कसे रहातील? त्यांनीही संबंधित चॅनेलच्या कार्यालयावर जाऊन दगडफेक केली.

या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्याला दलितांच्या मुद्यासंदर्भात बोलायचे होते. त्यासाठी हे व्यासपीठ होते. पण ही संधी चॅनेलने आपल्याकडून हिरावून घेतली, असे आठवलेंचे म्हणणे आहे. प्राईम टाईमला दाखविल्या जाणार्‍या कार्यक्रमात समाजातील संवेदनशील मुद्यांवर चर्चा करू द्यायला चॅनेलची मंडळी परिपक्व आहेत, असे आठवलेंना कसे वाटले? अशा कार्यक्रमातून चर्चा केल्याने दलितांची स्थिती संपूर्ण समाजाला कळेल आणि त्यांच्या मानसिकतेत फरक पडेल हे आठवले कशाच्या आधारावर बोलतात? असल्या सवंग प्रसिद्धीच्या माध्यमातून हा संवेदनशील विषय तितक्याच गंभीरपणे हाताळला तरी जाऊ शकेल काय? चॅनेलला तिथे 'वाचाळ' राजकीय नेता हवा होता, त्यांनी आठवलेंपेक्षा निरूपम यांची निवड केली. यापेक्षा या प्रकरणाला जास्त महत्त्व नाही. त्याला कुठले वळण द्यायचीही गरज नाही. पण एकुणात या निमित्ताने प्रसिद्धीसाठी राजकीय नेत्यांची स्खलनशीलता मात्र दिसून आली.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: राजकारणाचा रियालिटी शो