मंथन | बाबा आमटे | मराठी दिन | गांधी जयंती | सावरकर | ब्लॉग-कॉर्नर
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » आज-काल » मंथन » आता मने सांधणे गरजेचे
Feedback Print Bookmark and Share
 
WDWD
वाईटावर विजय या स्वरूपात दसरा साजरा केला जातो. पण गेल्या आठवडाभरापासून धगधगत असलेल्या धुळ्यात हा उत्सव कोणत्या स्वरूपात साजरा केला गेला असेल? माहित नाही. आनंद व्यक्त करण्याचा, मिठाई वाटण्याच्या या सणाच्या दिवशी धुळ्यात आज पाणी मिळेल का हा मुख्य प्रश्न होता. जवळपास ८० टक्के घरे जाळली गेलेल्या धुळ्याच्या गजानन कॉलनीत सण म्हणून काही जाणवतही नव्हते. आणि जाणवेल तरी कसे? पूर्णपणे उध्वस्त झालेल्या या भागात दहशत, शांतता आणि धुमसत असलेला तणाव तेवढा दिसत होता.

नुकसान दोन्ही समाजाचे झाले आणि परस्परांचे नुकसान करताना माणूसकीही गाडली गेली. राज्य राखीव दलाच्या दोन गटांनी तातडीने पावले उचलली नसती तर माधवपुरा परिसरातील चंद्रकांत, पुष्पा निर्माला, स्वीटी, योगेश, योगिता, सुनील, रत्ना, दीपाली हा चौधरी परिवार आणि इमाम शेख, सलमा शेख हेही या आगीत पोळले गेले असते.

हिंदू रक्षा समितीचे बॅनर फाडण्यावरून उसळलेली ही दंगल अचानक झाल्यासारखी वाटली नाही. कारण ती इतकी दिवस धगधगत होती, याचाच अर्थ त्याचे स्वरूप अगदी नियोजित होते. मच्छी बाजारात पोलिस चौकीवरच हल्ला चढविण्यात आला. एवढे धैर्य दंगेखोरात आले कसे? प्रशासनाने शांततेचा दावा केला तरी खुद्द मुख्यमंत्र्यांनी धुळ्यात अजूनही तणाव असल्याचे मान्य केले आहे. बुधवारी धुळ्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले मंत्री कोणतेही विधान करण्यास धजावत नव्हते. रविवारपासून ते बुधवारपर्यंत कोणताही स्थानिक नेता दंगल थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यास बाहेर पडला नव्हता. यातून काय संदेश जातो? विलासराव देशमुख आणि श्रीप्रकाश जैस्वाल आल्यानंतरच हे नेते बाहेर कसे पडले?

या दंगलीच्या काळात जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे व पोलिस अधीक्षक एस. कोल्हे या दोघांतच समन्वय नसल्याचेही दिसून आले. पोलिस अधीक्षकांना उच्च रक्तदाबामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे समजते. समन्वयच नसल्याने काय कारवाई करायची याची दिशाच स्पष्ट होत नव्हती. मंगळवारी राज्य सुरक्षा दलाच्या जवानांनी शस्त्राची एक गाडी जप्त केली. गाडी पोलिसांचीच होती. पण त्यात शस्त्रे होती. चालवणारी व्यक्तीही पोलिसातच होती. पण त्याची ड्यूटी मुळात तिथे लावलेलीच नव्हती. असे असताना ही गाडी शस्त्रे घेऊन कोठे जात होती? यासंदर्भात गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही विचारणा केली असता त्यांनी चौकशी चालू आहे, असे सरकारी छाप उत्तर दिले.

इकडे हे असे असताना काही भागात स्वतःला अतिशहाण्या समजणार्‍या काहींनी दंगलीत आग ओतण्यासारखे वर्तनही सुरूच ठेवले होते. शिवप्रताप नावाच्या कॉलनीत एक पोलिस कर्मचारी रहातात. तेथील बहुसंख्याकांनी त्यांना संरक्षण देऊ केले आणि त्यांना वाचविण्याचे हरप्रयत्न केले. त्यावर या महाशयांनी त्यांचे आभार व्यक्त करायचे सोडून या रहिवाशांनाच फैलावर घेतले. मुक्त गालिप्रदान केले. त्यांना वाचवायला उगाच गेलो, असे या लोकांना वाटले. अखेर माध्यमांनी हे प्रकरण पोलिस निरिक्षक चौधरींकडे कळविल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित महाशयांच्या वर्दीचा रूबाब उतरवला.

WDWD
दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, जात नसते. त्यामुळे आता कोणताही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन न बाळगता या दंगलीच्या जखमांवर औषध लावले पाहिजे. दंगलीच्या निमित्ताने निर्माण झालेली अराजकता आता पोलिसांनी संपवली पाहिजे. देशभरात अशांता असताना अशा दंगली होणे परवडणारे नाही. त्यामुळे तणावात भरच पडेल. धुळ्याच्या शेजारीच मालेगाव आहे. काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा ते बॉम्बस्फोटांनी हादरले होते. शेजारच्या जळगाव जिल्ह्यात सिमीचा गड असल्याची कबुली दस्तुरखुद्द पोलिस महासंचालक अनामी रॉय यांनीच दिली आहे. हे सगळे पहाता दंगली परवडणार्‍या नाहीत.

राजकीय लोकांनीही आता याचे भांडवल करायला नको. अन्यथा मतांच्या राजकारणात मानवतेचा मात्र बळी जायचा. दंगलीने शांतताप्रिय धुळ्यावर जखमा दिल्या आहेत. त्या लवकरात लवकर भरल्या गेल्या पाहिजे. या दंगलीत कोट्यवधींचे नुकसान झाले. ते भरून निघेलही कदाचित. पण दोन समाजात निर्माण झालेली तेढ मिटविणे हे गरजेचे आहे. त्यासाठीच आता सामंजस्याची गरज आहे.
संबंधित माहिती शोधा