संमेलनाचे अध्यक्षपद भूषवून मिळणा-या समाधानापेक्षा माझ्या कविता लोक वाचतात, ऐकताच यात मला त्याहून अधिक समाधान मिळते. म्हणूनच अध्यक्षपदाची निवडणूक न लढविण्याचा निर्धार मी केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
संमेलनासाठी भव्य मंडप, गर्दी आणि आता तर विश्वसाहित्य संमेलन होत असल्याने संमेलनाचे स्वरूपच पालटून गेले आहे. संमेलनात होत असलेल्या या बदलाबाबत पाडगावकरांनी नाराजी व्यक्त केली. गर्दीवरून त्या संमेलनाचा दर्जा ठरत नाही आणि कोट्यवधी रुपये खर्च करून एकाचठिकाणी संमेलन भरविण्यापेक्षा ठिकठिकाणी संमेलने घेतली तर सर्वच साहित्यप्रेमींना त्याचा लाभ होऊ शकतो आणि ख-या अर्थाने साहित्यचळवळीला चालना मिळू शकते. पण, आज ऐकणारे कोणी नसल्याने मी सल्ला देण्याच्या फंदात पडत नाही, असे त्यांनी मिष्किलपणे सांगितले. प्रतिभेची कमतरता आजची गाणी चिरकाल टिकत नाहीत याबाबत बोलताना ते म्हणाले, मी एखादे गाणे-कविता केले की, चाली लावताना संगीतकाराला पूर्ण स्वातंत्र्य देतो. अनेकवेळा मला चाल पसंत पडत नाही. तरीदेखील मी तक्रार करत नाही. श्रीनिवास खळे, देवांसारखे चांगले संगीतकार मिळाल्याने ही गाणी चिरकाल राहिली. आजची गाणी टिकत नाहीत कारण, आजच्या पिढीमध्ये प्रतिभेचा अभाव जाणवतो. त्यांचे वाचन अपुरे असते. साहित्यिकाची काहीच माहिती नसते. म्हणून नवकवींनी सर्वप्रथम वाचन केले पाहिजे. जुन्या लोकांचे संदर्भ घेतले पाहिजेत. प्रयत्न सुरू ठेवा माणसाने आयुष्यात कधीच खचून जाऊ नये हे सांगताना ते म्हणाले, जगण्यासाठी बरेच काही आहे. फक्त त्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. प्रत्येकाचे जीवन धावपळीचे झाल्याने चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला वेळच नाही. निर्मिती करण्याची देणगी माणसाला मिळाली आहे. आपण गाण्याचे उदाहरण घेतल्यास आपण इतक्या घाईत असतो की, गाणे आपल्याला ऐकूच येत नाही. आपण गाऊ लागलो की, गाणं सुचू लागते. त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत, असा संदेश त्यांनी दिला.