1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन

नवा लादेन ''बैतुल्ला मसूद''

नवा लादेन ''बैतुल्ला मसूद'' -
लाहोरजवळील मनावा येथील पोलिस ट्रेनिंग सेंटरवर झालेल्या हल्ल्याचा 'मास्टरमाईंड' तहरीक ए तालिबानचा नेता बैतुल्ला मसहूद असल्याचे आता पुढे आले आहे. हा मसूद कोण हे फार आठवायची गरज नाही. ओसामा बिन लादेन व मुल्ला ओमरनंतर जगभरातील 'टेरर नेटवर्क'मध्ये बैतुल्लाचे नाव घेतले जाते. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येतही त्याचे नाव आले होते. पाकिस्तानतल्या वझिरीस्तान प्रांतात आपले समांतर सरकार स्थापन करणारा बैतुल्ला पाकचे तालिबानिस्तान करण्यासाठी सध्या झटतोय. अमेरिका आणि ब्रिटन हे त्याचे दोन मुख्य शत्रू असून 'जिहाद'नेच या जगात शांतता नांदेल असे त्याचे तत्वज्ञान आहे.

बैतुल्लाची जडणघडण पाहिली तर त्याचे विचार असे का झाले हा प्रश्न पडण्याचे कारण नाही. पाकमधील विकास, शिक्षणापासून वंचित राहिलेल्या दक्षिण वझिरीस्तान प्रांतातील मसूद नावाच्या जमातीशी बैतुल्ला निगडीत आहे. आधुनिक शिक्षणाचा त्याला काहीही गंध नाही. मदरशात जाऊन तिथे जे काही शिकवले गेले त्यावर त्याची सगळी वैचारीक बैठक आधारलेली आहे. त्याच्या अतिरेकीपणाचे बीजच या मदरशात पेरले गेलेय. मदरशात शिकत असतानाच तो अफगाणिस्तानातील तालिबानींच्या संपर्कात आला. पुढे अफगाणिस्तानात जाऊन त्याने तालाबिनी 'कार्य' पाहिले नि त्याची आवृत्ती पाकिस्तानात करायची याची खुणगाठ त्याने मनाशी बांधली.

मसूदच्या मृत्यूच्या अफवा
  मसूदला उच्च रक्तदाबाचा त्रास असून त्याची किडनी फेल झाली आहे. गेल्या वर्षी सीएनएने त्याच्या मृत्यूची बातमी दिली होती. पण त्याच्या सहकार्‍यांनी ती अफवा असल्याचे म्हटले होते. इतरही अनेक प्रसारमाध्यमांनी त्याच्या मृत्यूची बातमी दिली. पण तो अजूनही जिवंत आ      
वझिरीस्तानचा हा बैतुल्ला जगासमोर आला तो नेक मोहम्मद या नेत्याच्या मृत्यूनंतर. तालिबानचा प्रमुख मुल्ला ओमरनेच खुद्द बैतुल्लाच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला. त्यानेच त्याला महसूद प्रांताचा प्रमुख नेमले. पुढे आपल्याला मिळालेली जहागिरी त्याने पूर्ण दक्षिण वझिरीस्तानपर्यंत विस्तारली. या भागाचा तो अनधिकृतरित्या प्रमुख झाला. अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढविल्यानंतर तालिबानी अतिरेक्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा हवी होती. बैतुल्लाने या अतिरेक्यांना आपल्या भागात आश्रय दिला.

याच काळात उत्तर वझिरीस्तान व दक्षिणेच्या काही भागात त्याचे समांतर सरकार चालू लागले. तो लोकांकडून करही गोळा करू लागला. या भागातील न्यायनिवाडे करण्याची जबाबदारीही त्याने आपल्या खांद्यावर घेतली. लोकही न्यायालयात जाण्याऐवजी त्याच्याकडे येऊ लागले. पुढे या भागात त्याने शरीयाची अंमलबजावणी सुरू केली. मग शाळा कॉलेजे बंद पाडणे, संगीत ऐकण्यास, व्हिडीओ पाहण्यास बंदी आली. तालिबानीकरणाचा कट्टर पुरस्कर्ता असलेल्या बैतुल्लाला मुल्ला ओमरप्रमाणे स्वतःचा फोटो काढणे आवडत नाही.

मधल्या काळात त्याने स्वतःचे लष्करही बांधले. हे लष्कर अतिशय शिस्तबद्ध आणि विविध भागात विभागले गेलेले आहे. प्रत्येकाची कामे ठरलेली आहेत. राजकीय नेत्यांना कोणी 'टार्गेट' करायचे आणि अमेरिकीधार्जिण्या लोकांना कोणी संपवायचे ही कामे ठरलेली आहेत. त्याच्या इमानी सैनिकांनी ही कामेही निष्ठेने पार पाडली आहेत. त्यामुळेच २००६ नंतर पाकिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट व हिंसाचाराला उत आला. या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी येथे आलेल्या पाकिस्तानी लष्करानेही त्याच्यापुढे हात टेकले. पुढे तेहरीक ए तालिबानचा नेता म्हणून त्याच्या नावाची घोषणा केल्यानंतर तर त्याच्या दहशतीचा विस्तार झाला. तालिबानींना हाकलण्यासाठी या भागात आलेले लष्कर अखेर मागे मागे सरकू लागले.

वझिरीस्तान भागात तर त्याच्या निष्ठावंत सैनिकांनी सरकारी फौजेला सळो की पळो करून सोडले. अखेर वैतागून तत्कालीन मुशर्रफ सरकारने त्याच्याशी तह केला. त्याअंतर्गत सरकारने निमलष्करी दलांशिवाय बाकीचे सैनिक या भागातून काढून घेतले. त्या बदल्यात बैतुल्लाच्या सैन्याने सरकारी सैन्यावर हल्ला चढवू नये, विकासाच्या कामात अडथळा आणू नये व परदेशी अतिरेक्यांना आपल्या भागात थारा देऊ नये अशा अटी घालण्यात आल्या.

या तहाबद्दल बैतुल्लाला पाकिस्तान सरकारने वीस दशलक्ष डॉलर्स ( जवळपास शंभर कोटी रूपये) देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, हे पैसे या लष्करी कारवाईत बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना द्यावेत असे सांगून त्याने मानभावीपणा दाखविण्याचा प्रयत्न केला. २००५ मध्ये हा तह संपल्यानंतर बैतुल्लाने हल्ले पुन्हा एकदा सुरू केले. पुढे २००७ मध्ये पाकिस्तानी लष्कराने त्याच्याशी गुपचूप बोलणी करून त्याच्याशी शांतता करार केला. त्यासाठी त्याला पुन्हा एकदा कोट्यवधी रूपये देण्यात आले. मात्र, याचा तपशील जाहीर झाला नाही.

मसूदची ताकद
  पाकमध्ये तालिबानच्या वझिरीस्तानात, बाजौरमध्ये व स्वातमध्ये अशा तीन शाखा आहेत. स्वात शाखेशी पाक सरकारने शांतता करार केलाय. मसूदनेही मध्यंतरी वझिरीस्तानमधील वान्ना येथील मौलवी नझीर व मिरानशहा येथील हाफिझ गुल बहादूर यांच्या गटांशी समझौता केलाय.       
मसूदने पाकिस्तानच्या तालिबानीकरणाचा ध्यास घेतलाय. जानेवारी २००७ मध्ये त्याने बीबीसीच्या उर्दू सेवेला दिलेल्या मुलाखतीत आपली उद्दिष्ट्ये स्पष्ट केली होती. त्यात त्याने परकीयांविरूद्ध जिहादचे आवाहन करून अमेरिका व ब्रिटनविरूद्ध लढण्याची घोषणा केली होती. अमेरिकेच्या इशार्‍यावर नाचणारे सरकार त्याला नको आहे. त्यासाठी त्याने पाकिस्तानच्या अनेक शहरांत रक्ताचा सडा घालण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यात बॉम्बस्फोट घडविणे, आत्मघाती बॉम्बस्फोट आणि आता अंदाधुंद गोळीबाराचे नवे अस्त्र तो वापरतो आहे.

या आधी त्याने रावळपिंडीमध्ये सप्टेंबर २००७ मध्ये असाच हल्ला केला होता. पुढे २७ डिसेंबर २००७ मध्ये त्यानेच माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या केली. पुढे त्याने या हत्येत आपला सहभाग असल्याचे नाकारले असले तरी सुरक्षा दलातील अधिकार्‍यांच्या मते ही हत्या त्यानेच केली आहे. महिन्यापू्र्वीच श्रीलंकेच्या खेळाडूंवर लाहोरमध्येच हल्ला चढविण्यात आला होता. यामागे कोण होते हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी बैतुल्लाच त्यामागे असावा असा दाट संशय आहे. आता तर पुन्हा लाहोरमध्ये थेट पोलिसांवर हल्ला चढवून आपली ताकद दाखवून दिली आहे. त्याच्या अवघ्या वीस लोकांनी साडेआठशे पाकिस्तानी पोलिसांना आठ तास आपल्या ताब्यात ठेवले होते. एकूणच या दहशतीवरून बैतुल्ला हा पाकिस्तानचा उद्याचा ओसामा बिन लादेन किंवा मुल्ला ओमर ठरल्यास नवल वाटू नये.
About Writer
अभिनय कुलकर्णी