हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना करि अंतःकरणज तुज, अभि- नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
हा भग्न तट असे गडागडाचा आजी हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा गड कोट जंजिरे सारे । भंगले जाहलीं राजधान्यांची । जंगले परदास्य-पराभविं सारीं । मंगले या जगति जगूं ही आज गमतसे लज्जा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे ती बुद्धि भाबड्या जीवां । लाहुं दे ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
|