माओवादी व सीपीएन-यूएमएल पक्षात राष्ट्रीपतींची निवडीसारख्या प्रश्नावरून सत्तावाटपाबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा फिसकटल्याने नेपाळमधील राजकीय पेचप्रसंगाने गंभीर रूप घेतले आहे.
नवीन सरकारची स्थापना, राष्ट्रपतींची निवड व सत्तावाटपाबाबत विषयांवर सखोल चर्चा झाली मात्र अजूनपर्यंत समझोता झाला नसल्याचे सीपीएन-यूएमएलच्या केंद्रीय समितीचे सदस्य बिमल रावल यांनी स्पष्ट केले.
चर्चा सकारात्मक झाली मात्र अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. नेपाळी कॉंग्रेसच्या गिरीजाप्रसाद कोईराला यांना राष्ट्रपती बनवण्याचा प्रस्तावा माओवाद्यांनी फेटाळल्यानंतर सीपीएन-यूएमएलने राष्ट्रपतिपदासाठी दावा केला आहे.
माओवाद्यांनी वर्तणूक बदलल्याशिवाय कोणतेही सहकार्य किंवा समझोत्याची शक्यता नसल्याचे वक्तव्य नेपाळी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष रामचंद्र पौड्याल यांनी केले आहे.
माओवाद्यांनी भूतकाळात स्वाक्षरी केलेल्या शांती कराराचा पूर्णपणे सन्मान केल्याशिवाय त्यांच्याशी सरकार स्थापण्यासाठी सहकार्य अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
|